पहिला मृत्यू वर्षभरापूर्वी; आतापर्यंतची संख्या ११३९

नवी मुंबई : नवी मुंबईत १५ मार्च रोजी करोनामुळे पहिला मृत्यू झाला. त्याला सोमवारी वर्ष झाले असून वर्षभरात नवी मुंबईत ११३९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात ६०३ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये एकच मृत्यू होता. यावर्षी १५ दिवसांत १९ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

गेल्या वर्षी याच महिन्यात ८ मार्चला नवी मुंबईत करोनाचा पहिला रुग्ण सापडला. फिलिपाइन्सवरून आलेल्या एका धर्मप्रचारामुळे नवी मुंबईत ही संख्या नंतर पन्नास हजाराच्या घरात गेली आणि एक हजारापेक्षा जास्त नागरिकांना जीव गमवावा लागला. करोनाचा पहिला मृत्यू नवी मुंबईत १५ मार्च २०२० रोजी झाला होता. यानंतर हळूहळू रुग्णवाढ होत मृत्यूंची संख्याही वाढत गेली.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात फक्त एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर एप्रिलमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला व त्यानंतर मृत्यूंची संख्या वाढत जात महिन्याला शंभरपेक्षा अधिक झाली. जुलैमध्ये आतापर्यंत सर्वाधिक २०७ जणांचा मृत्यू झाला आहे. ऑक्टोबरनंतर मृत्यूंचे हे प्रमाण कमी होत गेले. जानेवारी व फेब्रुवारीमध्ये मृत्यूंची सख्या ४० पेक्षा कमी झाली होती. या महिन्यात पहिल्या पंधरा दिवसांत १९ जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूंची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. इतर शहराच्या तुलनेत मृत्युदर कमी असला तरी पालिकेसमोर हे मुख्य आव्हान असणार आहे.

पालिका आयुक्तांकडून मृत्युदर कमी करण्यासाठी प्रत्येक करोना मृत्यूबाबतची दररोज माहिती घेतली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांची व लहान मुलांची अत्यंत काळजी घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

नवी मुंबई शहरातील करोना मृत्युदर कमी आहे, परंतु इतर आजार असलेल्यांचा करोनामुळे मृत्यू होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे इतर आजार असलेल्यांनी, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.  -अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका