विकास महाडिक

रायगड जिल्ह्य़ातील २५६ गावांलगतच्या जमिनींचा विकास आराखडा तयार करण्याची राज्य शासनाने टाकलेली जबाबदारी पूर्ण करताना सिडकोने नैना क्षेत्रातील २४३ हेक्टर जमिनीची सहावी नगर नियोजन योजना जाहीर केली आहे. यापूर्वी या क्षेत्रासाठी सिडकोने पाच योजना तयार केल्या असून यातील २३ गावांतील ३७ हेक्टर जमिनाचा अंतरिम विकास आराखडा शासनाने मंजूर केला आहे. अशा प्रकारच्या ११ नगर नियोजन योजना सिडको तयार करणार असून यासाठी ५६० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ नैना क्षेत्रासाठी अधोरिखित करण्यात आले आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या आसपास असलेल्या २५६ गावांसाठी राज्य शासनाने नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र (नैना) जाहीर केले आहे. त्यामुळे या गावांचा आणि त्यांच्या आजूबाजूच्या जमिनींचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी शासनाने जानेवारी २०१३ रोजी सिडकोवर सोपविलेली आहे. त्यानुसार सिडकोने आतापर्यंत पाच नगर नियोजन योजना तयार केलेल्या आहेत. यात पहिली योजना ही १९.१२ हेक्टरसाठी आहे तर दुसरी (१९४ हेक्टर) तिसरी (१४२ हेक्टर) चौथी (३५० हेक्टर) आणि पाचवी (२४२ हेक्टर) साठी आहे. सहाव्या नगरनियोजन योजनेचे क्षेत्रफळ २४३ हेक्टर असून यात चिखले, मोह, शिवकर आणि पाली खुर्द या चार गावांचा समावेश आहे. अशा प्रकारच्या ११ नगर नियोजन योजना सिडको तयार करणार असून यातील एक ३७ हेक्टर जामिनीचा विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. सिडको या नैना क्षेत्रातील जमीन संपादन करणार नाही, पण येथील शेतकऱ्यांसाठी सिडकोने एक योजना जाहीर केली आहे. यात शेतकऱ्यांनी स्वेच्छेने त्यांची जमीन सिडकोला दिल्यास सिडको त्यातील चाळीस टक्के विकसित जमीन परत देणार असून त्यावर पावनेदोन वाढीव चटई निर्देशांक देणार आहे. सिडकोकडे राहणाऱ्या साठ टक्के जागेत रस्ते, गटार, मल वाहिन्या अशा पायाभूत सुविधा पुरविणार आहे. त्यासाठी सिडकोने सातशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.

शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सिडकोने जाहीर केलेल्या सहाव्या नियोजन योजनेत या नैना क्षेत्रातील ३७ हेक्टर जमीन आरक्षित ठेवली असून यात शाळा, खेळाचे मैदान, सेट्रल पार्क, स्मशानभूमी, बाजारहाट आणि ग्रोथ सेंटर यांच्यासाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. सिडको या सर्व क्षेत्राचा एक मुख्य आराखडा नंतर तयार करणार असून काही क्षेत्र हे मनोरंजन, शैक्षणिक, आरोग्य याला वाहिलेल्या संस्थांसाठी राखीव ठेवणार आहे. नैना क्षेत्रात यापूर्वीच मुंबईतील अनेक बडय़ा विकासकांनी जमीन घेऊन ठेवलेल्या आहेत. सिडकोच्या या नगर नियोजन योजनांचा फायदा विकासकांना होणार आहे.

‘एमएसआरडीसी’ मागेच

शासनाने नैना क्षेत्रात येणाऱ्या २५६ गावांलगतच्या जमीन विकासाची जबाबदारी जशी सिडकोवर टाकली आहे तशीच जबाबदारी मुंबई-पुणे दुतगती महामार्गालगतच्या २२४ गावांच्या ४७४ हेक्टर जमिनीची जबाबदारी रस्ते विकास महामंडळावर टाकण्यात आलेली आहे. मात्र या गावांच्या विकासाबाबत या एमएसआरडीसीची फारशी प्रगती नसल्याचे दिसून येते. या नियोजनामुळे मुंबई-पुणे महामार्गावरही इमारती दिसणार आहेत.

बेकायदा बांधकामांना जोर

एमआरटीपी कायद्या १९६६ नुसार सिडको या नगर नियोजन योजना जाहीर करीत आहे. यावर हरकती व सूचना देण्याची तरतूद आहे. मात्र पहिल्या विकास आराखडय़ातही येथील नागरिक जास्त आग्रही नसल्याचे दिसून आले. या भागात मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे करण्यात आली आहेत. नवी मुंबईतील बेकायदा बांधकामे कायम करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे आपलीही बांधकामे नियमित होतील, या आशेने येथे सर्रास बेकायदा बांधकामे केली जात आहेत.

सिडकोने नगर नियोजन योजना सहा जाहीर केलेली आहे. त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना ही योजना समजावून सांगितली जाणार आहे. त्यानंतर त्याचा आराखडा नगर संचालक पुणे यांच्याकडे पाठविला जाणार आहे. ही योजना दोन वेळा शेतकरी व दोन वेळा संचालक मंडळापुढे ठेवली जाणार आहे.

व्ही. वेणुगोपाल, मुख्य नियोजनकार (नैना) सिडको