इंदिरानगर भागात गाळ नाल्यातच पडून; अंतिम मुदतही संपली

मान्सूनपूर्व कामांत नालेसफाई ही महत्त्वाची बाब असतानाही नवी मुंबईत याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. २५ मेपर्यंत ही कामे करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या होत्या. असे असताना १ जून उजाडला तरी झोपडपट्टी भागात नालेसफाई सुरूच आहेत. इंदिरानगर भागातील मोठा नाल्यातील काढलेला गाळ नाल्यातच पडून आहे. पाऊस झाल्यास तो गाळ पुन्हा नाल्यात वाहून जाऊ शकतो.

इंदिरानगर झोपडपट्टी विभागातील नाला हा शहरातील सर्वात मोठा असून तो पावसाळ्यात भरून वाहतो. दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी एक मुलगा वाहून गेल्याची घटना घडली होती. तेव्हापासून या ठिकाणी नाल्यालगत मोठी संरक्षण भिंत बांधण्यात आलेली आहे. याच नाल्यात कंत्राटदारांनी सफाई करून काढलेल्या गाळाचे ढिगारे नाल्यातच ठेवले आहेत. कोटय़वधी रुपये खर्च करून काढलेला गाळ पुन्हा नाल्यातच वाहून जाणार असेल तर नालेसफाईचा खर्च पाण्यातच जाणार आहे.

रबाळे एमआयडीसीतील नाल्यांची सफाई झालेली नाही. यादवनगर भागात नालेसफाईची कामे सुरू आहेत, तर बोन्सरी येथेदेखील नालेसफाई झालेली नाही. वाशी सेक्टर १७ येथील नालेसफाईला अद्याप सुरुवात झालेली नाही.

नालेसफाईची निविदा चार महिन्यांकरिता असते. शहरातील सर्वच नाल्यांची सफाई करण्यात आली आहे. यादवनगर भागातील नाल्यातील राडारोडा काढण्याचे काम सुरू आहे. इंदिरानगर भागातील नालेसफाई करण्यात आलेली आहे. त्यादरम्यान नाल्यात गाळ नव्हता. त्या ठिकाणी पुन्हा पाहणी करण्यात येईल.    – तुषार पवार, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग