रस्त्यावरील झोपडय़ा व गाळे जमीनदोस्त

पनवेल बस आगारासमोरील झोपडय़ांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करणाऱ्यांवर शनिवारी महापालिकेने कारवाई केली. पालिकेच्या तिजोरीत कोणताही व्यावसायिक कर भरायचा नाही आणि हजारो रुपये भाडय़ाचा मलिदा लाटायचा, असा प्रकार गेली कित्येक वर्षे या झोपडय़ांत सुरू होता. त्यावर पालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी बडगा उगारल्यामुळे बस आगारासमोरील रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.

पनवेल बस आगारासमोरील रस्त्यालगत राहण्यासाठी बांधलेल्या झोपडय़ांमध्ये गेली अनेक वर्षे व्यावसायिक गाळे चालवण्यात येत आहेत. खासगी बसची कार्यालये, उपाहारगृहे, गॅरेज असे अनेक व्यवसाय या झोपडय़ांत सुरू आहेत. या झोपडय़ांच्या मालकांची नोंद पालिकेकडे अल्प उत्पन्न गटात आहे. पनवेल हायवे म्हणून हा परिसर ओळखला जातो; मात्र रेल्वे स्थानक किंवा बस आगारातून पनवेलमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला पनवेलचे सौंदर्य दिसण्याऐवजी आधी या झोपडय़ांचा बकाल परिसर दिसे. पनवेलमधील तलावांचे सौंदर्य, पर्यटन स्थळे आणि ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी पर्यटकांना या गर्दीतूनच वाट काढावी लागे. या झोपडय़ांतून मिळणाऱ्या भाडय़ाच्या जोरावर येथील झोपडीमालक विकासक झाले आहेत. काहींनी येथे दुमजली व तीन मजली हॉटेल्स बांधली होती. या कारवाईत हे सर्व अनधिकृत उद्योग जमीनदोस्त करण्यात आले आहेत. ही कारवाई करून महापालिका प्रशासनाने पनवेलमधील अवैध उद्योगांचा आर्थिक कणा मोडल्याचे बोलले जाते.

नवीन पनवेल येथील पंचशील नगरमधील व्यावसायिक झोपडय़ांवर कारवाई झाल्यानंतर या झोपडीमालकांनी रस्त्याशेजारी वीट बांधकाम करून शटर लावले आहे. आता बस आगार परिसरातील झोपडय़ांचे पुनर्वसन कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वारंवार अडवणूक

झोपडय़ांचे पुनर्वसन करा अन्यथा जागा सोडणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या या झोपडपट्टीवासीयांनी अनेकदा विविध राजकीय पक्षांच्या मदतीने या जागेवरील ताबा कायम ठेवला. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे या झोपडय़ांचे पुनर्वसन होऊ शकले नाही. या झोपडीधारकांच्या हटवादीपणामुळे पनवेलमधील उन्नत मार्गाच्या सेवारस्त्याचे काम रखडले.