सीमा भोईर, पनवेल

कळंबोली सेक्टर ६ जवळील सूर्योदय सोसायटीसमोर असलेल्या धारण तलावाच्या बंधाऱ्याच्या परिसरात अनधिकृत झोपडय़ा उभारल्या जात आहेत. या झोपडय़ा खारफुटीची झाडे तोडून बांधण्यात आल्या आहेत.

खारफुटीचा भाग समुद्राचे पाणी शहरात जाण्यास प्रतिबंध करतो. २६ जुलै २०१५ला कळंबोली परिसर जलमय झाला होता. खारफुटीची कत्तल हे त्यामागचे प्रमुख कारण होते. त्यामुळे समुद्राचे पाणी थेट आत शिरले. सूर्योदय सोसायटीसमोरच्या तलावाच्या बंधाऱ्यावर झोपडय़ा उभारल्या जात आहेत. या झोपडय़ा खारफुटीची झाडे तोडून बांधल्या आहेत. पनवेल पालिकेने पंतप्रधान आवास योजनेसाठी सर्वेक्षण करून झोपडय़ांना सर्वेक्षण क्रमांक दिले आहेत. आपल्यालाही घर मिळेल, या हेतूने या परिसरात झोपडय़ा बांधून झोपडी माफिया त्या गरजू व्यक्तींना विकत असल्याची चर्चा आहे.

खारफुटी असल्याचे कारण देत नाल्यातील गाळ काढण्यात टाळाटाळ केली जात असताना खारफुटी तोडून झोपडय़ा बांधणाऱ्यांकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. कळंबोली वसाहत खाडीजवळ आहे. खारफुटी तोडून परिसर झोपडय़ांनी व्यापून टाकल्यास पाणी वसाहतीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या अनधिकृत झोपडय़ांबद्दल आम्ही सिडकोच्या अतिक्रमण विरोधी विभागाला कल्पना दिली आहे. यावर तेच योग्य ती कारवाई करतील.

– गिरीश रघुवंशी, कार्यकारी अभियंता, सिडको

झोपडपट्टीधारकांना सर्वेक्षण क्रमांक दिले असले, तरी त्यानंतर त्याची पूर्णत: तपासणी करूनच पुढचा निर्णय घेतला जाईल.

– संजय कटेकर,

बांधकाम विभाग, पनवेल महानगरपालिका

आम्ही सिडकोकडे गाळ काढण्याची मागणी केली तर सिडको खारफुटीची सबब देते, मग अनधिकृत झोपडय़ांना सिडकोचे अभय का? त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे.

– आत्माराम कदम, रहिवासी, कळंबोली