रबाळे आणि दिघा परिसरातील एमआयडीसीच्या आरक्षित भूख्ांडांवर भूमाफिया आणि दलाल यांनी मिळून अतिक्रमण केले आहे. गवतेवाडीत एमआयडीसीच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई करून पत्र्यांचे कुंपण घातले होते, तरीही भंगारमाफियांनी दुकाने आणि झोपडय़ा थाटल्या आहेत. येथील काही भूखंडांवर भंगाराची दुकाने, प्लास्टिक आणि रसायनांची दुकाने थाटण्यात आली आहेत.
गवते वाडी, शंकरवाडी, गणेश नगर, यादव नगर, चिंचपाडा या भागांत बेकायदा झोपडय़ा उभारल्या आहेत. विशेष म्हणजे पत्र्याचे शेड बांधून भंगाराची गोदामे थाटली आहेत. या ठिकाणी गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्या कंपन्या, रासायनिक कंपन्या आहेत. कंपन्यापासून काही अंतरावर सध्या झोपडपट्टी आणि भंगार दुकानांचे पेव फुटल्याने सुरक्षेच्या नियमांना फाटा देण्यात आला आहे.
एमआयडीसीने काही महिन्यांपूर्वी गणेश नगर, यादवनगर या भागातील भूखंडावर वसलेल्या दुकांनावर कारवाईही केली होती, तर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी लाखो रुपये खर्चून कुंपण टाकले होते. ते तोडून माफियांनी येथे शिरकाव केला आहे. येथील जागेसाठी दोन ते तीन हजार रुपये भाडे घेतले जाते.
चौकट
एमआयडीसीच्या भूखंडावरील झोपडय़ांना एमआयडीसीच्या गळती लागलेल्या जलवाहिनीतून पाणी मिळत आहे. यात दलालांचा मोठा वाटा आहे. याशिवाय महावितरणच्या खांबावरून चोरून वीज जोडण्या घेतल्या आहेत.

एमआयडीसीच्या अतिक्रमण मुक्त केलेल्या भूखंडावर पत्र्याचे कंपाऊड टाकण्यात आले होते. तेथील पत्रे चोरीला गेले असून त्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसीच्या भूखंडावर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यावर पुन्हा कारवाई करण्यात येईल. येत्या आठवडाभरात कमेकिलच्या गोदामांवर मोठय़ा प्रमाणावर कारवाई करण्यात येणार आहे.
अविनाश माळी, एमआयडीसी उपअंभियता

शरद वागदरे,