इंदिरानगरला एकही रुग्ण नाही; चार आरोग्य केंद्रांत दहापेक्षा कमी रुग्ण

नवी मुंबई : शहरातील १२ करोना काळजी केंद्रे बंद केल्यानंतर आता नागरी आरोग्य केंद्रांतीलही रुग्णसंख्या घटली आहे. यात झोपडपट्टी भागात अत्यल्प करोना रुग्ण शिल्लक आहेत. इंदिरानगर केंद्रात एकही रुग्ण नाही तर चिंचपाडा, इलठणपाडा, कातकरीपाडा व तुर्भे या केंद्रात दहापेक्षा कमी रुग्ण आहेत. सध्या शहरात एकूण उपचाराधीन रुग्ण हे ७८८ इतके आहेत.

नवी मुंबईत करोनाबाधितांची संख्या ५२,७१० पेक्षा जास्त झाली आहे तर १०८२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मागील दहा महिन्यांत नागरिकांमध्ये करोनाबाबत भीतीचे वातावरण होते. परंतु आता नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले असून करोनामुक्तांचे प्रमाण वाढले आहे. दिवाळीपूर्वी खाटा मिळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत होती. आता ८५ टक्के खाटा रिकाम्या आहेत. शहरातील १२ करोना काळजी केंद्रे पालिका प्रशासनाने बंद केली असून फक्त वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रात उपचार एकवटले आहेत. अत्यवस्थ रुग्णांवर नेरुळच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात करोना रुग्ण होते. त्यामुळे शहरातील २३ नागरी आरोग्य केंद्रेही रुग्णांनी भरलेली होती. पालिका आयुक्त नागरी आरोग्य केंद्रातील प्रमुखांशी दररोज संपर्क करीत कारणमीमांसा करीत होते. दिवाळीनंतर येथील रुग्णसंख्या घटली आहे. आरोग्य केंद्रांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे करोना नियंत्रणात आला असून करोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. लवकरच प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रात उपचाराधीन रुग्ण शून्यावर आणण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले आहे. यात झोपडपट्टी असलेल्या भागाची करोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. इंदिरानगरमध्ये सध्या एकही रुग्ण नाही, तर चिंचपाडा, इलठणपाडा, कातकरीपाड व तुर्भे परिसरातही कमी रुग्ण शिल्लक आहेत.

तुर्भे तसेच इंदिरानगर नागरी आरोग्य केंद्राची जबाबदारी असलेल्या डॉ. कैलास गायकवाड यांनी सांगितले की, एखाद्या कुटुंबातील रुग्ण करोनाग्रस्त आढळल्यास त्याच्या सर्व कु टुंब सदस्यांसह संपर्कात आलेल्यांची करोना चाचणी करून घेण्यात येते. त्यामुळे संसर्ग खंडित करण्यात यशस्वी झालो. त्यामुळेच इंदिरानगरमध्ये आज एकही रुग्ण नाही. तर तुर्भे येथे फक्त ९ करोना रुग्ण आहेत.

६० नवे रुग्ण

नवी मुंबई  : नवी मुंबईत सोमवारी  ६० नवे करोनाबाधित आढळले असून एकाचाही मृत्यू झाला नाही. नवी मुंबईतील शहरातील करोनाबाधितांची संख्या  ५२,७७०  इतकी झाली असून मृतांचा आकडा १०८२   इतका झाला आहे.  आज शहरात ७८ जन करोनामुक्त झाले असून करोनामुक्तीचा दर ९६ टक्के आहे. एकूण ५०,९१८ जण करोनामुक्त झाले आहेत. तर शहरात ७७० उपचाराधीन रुग्ण आहेत.

३३९० जणांना लस

नवी मुंबईत आरोग्य सेवकांना लस देण्यात येत असून आतापर्यंत ३३९० जणांना तर बुधवारी ८९३ जणांना लस देण्यात आली.

शहरात नवे रुग्ण तसेच उपचाराधीन रुग्ण मोठ्या प्रमाणात कमी झाले असून शहर करोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे. यामध्ये शहरातील नागरी आरोग्य केंद्रांचा व तेथील सर्व करोना योद्ध्यांचा मोलाचा वाटा आहे.

– संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त