कोपरखरणेतील प्रकार; पालिका म्हणते ही जागा सिडकोचीच

नवी मुंबई कोपरखरणे रेल्वे स्थानकालगतच्या सिडकोच्या एका भूखंडावरील झोपडपट्टी कारवाई करीत सिडकोने हटवली, मात्र त्यांनी आता फुटपाथ आणि भूखंडाचे कुंपण या मोकळ्या जागेत  आपला संसार थाटला आहे. ते फुटपाथवर झोपत असल्याने  दुर्घटनेची शक्यता आहे. असे असताना याकडे कोपरखैरणे अतिक्रमणविरोधी विभाग मात्र डोळेझाक करीत आहे.

कोपरखैरणे रेल्वे स्टेशन हद्दीत काही वर्षांपासून सिडकोच्या भूखंडांवर झोपडय़ांचे अतिक्रमण होत आहे. सिडकोने विक्री केलेल्या एका भूखंडावर वर्षांपूर्वी झोपडय़ांचे अतिक्रमण होऊन एक झोपडपट्टीच तयार झाली होती. झोपडय़ा काढल्यानंतरच ताबा घेणार असल्याचा पावित्रा हा भूखंड विकत घेतलेल्यांनी घेतला होता. त्यामुळे सिडकोने त्या वेळी मोठी कारवाई करीत ही झोपडपट्टी हटवत हा भूखंड रिकामा केला. याच वेळी अतिक्रमण करणाऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे गंभीर जखमी झाले होते. पण सिडकोने मागे न हटता कारवाई करीत झोपडय़ा हटवल्या व तत्काळ कुंपण बांधून जागा भूखंड मालकास हस्तांतरित केली होती.

मात्र हा भूखंड वगळता त्याला लागून असलेल्या भूखंडावरील झोपडय़ांवर कारवाई केली नव्हती. काही महिन्यांपूर्वी हा भूखंडसुद्धा सिडकोने विकल्यावर या ठिकाणीही बंदोबस्तात कारवाई करीत भूखंड रिकामा केला होता.

त्यानंतर कारवाई केलेल्या झोपडपट्टीवासीयांनी फुटपाथ आणि भूखंडाचे कुंपण या मोकळ्या जागेत अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी सुमारे दीड ते दोन फुटांच्या उंचीवर ही वस्ती असली तरीही दोन ठिकाणी पायवाट बनवल्याने रस्त्यालगत आली आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार ते सिडकोच्याच जागेवर आहेत. मात्र यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा राहिली नाही. हा रस्ता कोपरखैरणे स्टेशनसमोर असून रस्ता केवळ पाच मीटरचा आहे. त्यातच ज्या ठिकाणी झोपडय़ा वसल्या त्यांच्या समोर एक मॉल असून त्यात सिनेमागृह, हॉटेल असल्याने या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून जावे लागते. त्यातच या झोपडय़ा तेथे वसल्याने आता पादचाऱ्यांनी चालायचे कुठून? हा प्रश्न निर्माण झाला आहे.  झोपडपट्टीवर कारवाई झाल्यापासून या लोकांनी फुटपाथ व्यापला असला तरी त्यावर कोपरखैरणे विभाग कार्यालय कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या ठिकाणीही लवकरच कारवाई करण्यात येईल अशी माहिती सिडको अतिक्रमण विभागाने दिली आहे.

हिरव्या रंगाचा पडदा बांधून ज्या झोपडय़ा बांधल्या गेल्या आहेत, त्या पालिकेच्या जागेवर नसून सिडकोच्या जागेवर आहेत. या बाबत संबंधित प्रशासनाला कळवण्यात आले आहे.

– अशोक मडवी, विभाग अधिकारी कोपरखैरणे

हा रस्ता अगोदरच लहान आहे. त्यातच झोपडपट्टी थेट फुटपाथवर आल्याने चलणेही मुश्कील झाले आहे. त्यात रात्री-अपरात्री एखाद्या वाहनचालकाचा ताबा सुटला तर मोठी दुर्घटना होऊ  शकते.

– संदीप राजपूत, स्थानिक रहिवासी.