उद्यानांच्या देखभालीत कसूर करणाऱ्यांवर पालिका मुख्यालयातून लक्ष

नवी मुंबई पालिकेतील सर्व कायम व कंत्राटी कामगारांवर नजर ठेवणारे स्मार्ट वॉच आता शहरातील सर्व उद्यानात काम करणारे स्वच्छता निरीक्षक व माळ्यांना दिले जाणार आहेत. यापूर्वी ते साफसफाई कामगार व वाशी येथील पालिका रुग्णालयातील डॉक्टरांना बंधनकारक करण्यात आलेले आहेत. काही डॉक्टरांनी याला विरोध केला आहे. पालिका आठ हजार स्मार्ट वॉच कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मनगटावर बांधणार आहे.

नवी मुंबई पालिका आस्थापनेतील सर्व कायम व कंत्राटी कामगार अधिकाऱ्यांची कामाची जागा ओळखणारे एक स्मार्ट वॉच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ कामाचे ठिकाणच नाही तर त्या कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची माहितीदेखील या स्मार्ट वॉचमुळे मिळणार आहे. या स्मार्ट वॉचमुळे कर्मचारी किती वाजता कामावर आला, किती वाजता कामावरून गेला, कोणत्या क्षेत्रात तो काम करीत आहे. यासारख्या हालचालींची माहिती मुख्यालयात असणाऱ्या नियंत्रण केंद्राला मिळणार आहे. जीपीआरएस प्रणालीवर अवलंबून असणाऱ्या ही घडय़ाळे टप्याटप्याने आठ हजार ७०० पर्यंत कर्मचारी अधिकाऱ्यांना दिली जाणार आहेत. सध्या तीन हजार घडय़ाळे मनगटावर दिसू लागली असून पालिकेच्या दोनशेपेक्षा जास्त उद्यानात काम करणाऱ्या घटकांना ती आता दिली जाणार आहेत.

उद्यानांची योग्य दखल न घेणाऱ्या माळ्यावर यामुळे देखरेख राहणार आहे. कामाच्या वेळेत स्मार्ट वॉच वापरावा लागत असल्याने काही डॉक्टर नाराज झालेले आहेत. पालिका सेवेत कायमस्वरूपी असलेल्या डॉक्टरांची बाहेर दवाखाने सुरू असल्याने ते आपल्या सोयीनुसार रुग्णांची सेवा करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व हालचालीवंर ठेवणारी हे स्मार्ट वॉच वापरण्याला त्यांचा विरोध आहे. पालिका सेवेतील डॉक्टर आणि शिक्षक यांना सर्व प्रथम हे स्मार्ट वॉच देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेचे आयुक्त हा स्मार्ट वॉच वापरणार असतील तर इतर कर्मचारी अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना वापरण्यास कोणती अडचण आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पालिकेच्या सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गावर स्मार्ट वॉच ठेवणारी नवी मुंबई पालिका ही राज्यातील एकमेव पालिका आहे. आठ हजार कर्मचारी अधिकाऱ्यांना टप्याटप्याने ही घडय़ाळे दिली जाणार असून सध्या तीन हजार घडय़ाळे आलेली आहेत. यात आता उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांना ही घडय़ाळे दिली जाणार आहेत. शहरातील उद्यानांची काळजी घेण्याचा यामागचा उद्देश आहे.

डॉ. रामास्वामी, एन. आयुक्त, नवी मुंबई पालिका