आदिवासी पाडय़ांवरील सर्पदंशाच्या घटनांत वाढ

दऱ्याखोऱ्यात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी पाडय़ांवर सर्पदंशाच्या घटना वाढल्या असून अशाच प्रकारची एक घटना उरणमधील चिरनेर परिसरातील चांदईवाडी या पाडय़ावर घडली.

रवी नरेश कातकरी (६ वर्षे) या मुलाला विषारी घोणसने दंश केला होता. याची माहिती चिरनेरमधील निसर्ग पर्यावरण संवर्धन संस्थेला दिल्यानंतर त्यांनी तातडीने जाऊन या मुलाला स्वखर्चाने नवी मुंबईतील वाशीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. या मुलाची स्थिती स्थिर असून उपचार सुरू आहेत.

आदिवासी वाडीतील मुलाच्या पायाला घोणस जातीचा विषारी साप चावला होता. याची माहिती देण्यासाठी त्यांचे शेजारी व नातेवाईक आठ ते दहा किलोमीटरचे अंतर चालत चिरनेर येथील सर्पमित्र जयवंत ठाकूर यांच्याकडे आले. त्यांनी मुलगा कुठे आहे. याची चौकशी केली असता तो वाडीवरच असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर जयवंतने आपला आणखी एक सहकारी अनुज पाटील यांच्या मदतीने मुलाला व त्याच्या भावाला साथीला घेऊन उपचारांसाठी नेण्याचा निर्णय घेतला.

प्रथम उरणमध्ये जाण्याचे ठरविले मात्र तेथे उपचारांसाठी डॉक्टर नसल्याने व मुलाची स्थिती गंभीर होत असल्याचे दिसताच तातडीने नवी मुंबईतील वाशी येथील शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनुज यांच्या खाजगी वाहनाने मुलाला घेऊन रुग्णालयात पोहचल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

विषारी साप चावल्याने मुलाच्या शरीरात विषाचे अंश चढल्याने मुलाच्या बाहेरूनही चाचण्या कराव्या लागल्या, तो खर्च या दोघांनी केला. सध्या या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र सर्पमित्रांनी वेळेत पाडय़ावर जाऊन त्याला रुग्णालयात दाखल केल्याने त्याचा जीव वाचला आहे. अशा प्रकारे अनेक आदिवासींना या सर्पमित्रांनी मदत केली आहे. त्यामुळे या दोघांचे अभिनंदन केले जात आहे. तसेच या भागातील कोप्रोली येथील शासकीय रुग्णालयात उपचारांची व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे.