उद्यानाचा विकास न झालेल्या भागात गवत; अस्वच्छतेमुळे उंदरांचा वावर

नेरुळ सेक्टर २१मध्ये साकारण्यात आलेल्या रॉक गार्डनची योग्य देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. शिवाय उद्यानाच्या १२ हजार चौरस मीटर परिसराचा विकास करण्याचा विसर पालिकेला पडल्यामुळे तिथे गवत वाढले आहे. या गवतात सापांचा वावर वाढला असून साप आजूबाजूच्या निवासी संकुलांतही शिरकाव करू लागले आहेत.

रॉक गार्डनमध्ये प्रवेशशुल्क आकारले जात असूनही सुविधांची मात्र वानवा आहे. उद्यानाच्या संरक्षक भिंतीची पडझड झाली आहे. आसनव्यवस्था अपुरी आहे. चार महिन्यांपूर्वी लावण्यात आलेले दिवे आता बंद पडल्यामुळे काळोख पसरला आहे. काही ठिकाणी फरशा उखडल्या गेल्या आहेत. रॉक गार्डनचे क्षेत्रफळ ४० हजार चौरस मीटर आहे, मात्र त्यापैकी केवळ २८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचाच विकास करण्यात आला आहे. उर्वरित १२ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ अविकसित आहे. त्या भागाला आता जंगलाचे आणि कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. तिथे उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. नाग, मण्यार आणि फुरसे असे विषारी सापही येथे आहेत. हे साप उंदीर खाण्यासाठी निवासी भागात येतात. येथील सिद्धिविनायक सोसायटीतील रहिवाशांनी पालिकेचे आयुक्त आणि उद्यान विभागाला या संदर्भात निवेदन दिले आहे. गेली ५ ते ६ वर्षे सातत्याने पत्रव्यवहार केल्यानंतरही पालिका अधिकारी काहीच करत नसल्याबद्दल परिसरातील रहिवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

दिवाळीत भरदुपारी मण्यार साप आणि त्याची तीन पिल्ले सोसायटीमध्ये आढळली होती. अग्निशमन जवानांना बोलावून त्यांना पकडण्यात आले. या भागाचा वापर भिकारी प्रातर्विधींसाठी करतात. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या समस्येविरोधात गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही लढा देत आहोत. महानगरपालिकेकडे वारंवार निवेदने देऊनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. सापांची समस्या गंभीर आहे.

– संजय पिंपळे, रहिवासी, नेरुळ

उद्यानाच्या उर्वरित विकासासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. लवकर त्याचा विकास केला जाईल. तसेच त्या भागाची साफसफाई करण्यात येईल.

– तुषार पवार, उपायुक्त, नवी मुंबई महानगरपालिका