विनापरवाना वापर केल्यास आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल होणार

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकासाठी हॉटस अ‍ॅप, फेसबुक, मेसेजस यासह कोणत्याही समाज माध्यमातून पक्ष किंवा उमेदवारांच्या प्रचार केल्यास त्याची उमेदवार व पक्षाच्या खर्चात नोंद केली जाणार आहे. विना परवाना वापर केल्याचे निदर्शनास आल्यास आचारसंहिता भंगाचा गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकीत समाजमाध्यमाचा वापर करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असल्याची माहिती उरणच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे समाजमाध्यमांच्या स्वैर वापरावर बंधने येणार आहेत.

सध्या समाजमाध्यमांतून बिभित्स प्रकारच्या पोस्ट टाकल्या जात आहेत. त्यामुळे अनेकांच्या खासगी आयुष्यावरही परिणाम होत आहेत. समाजमाध्यामांवर बंधने घालण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचवेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या आचारसंहितेत या माध्यमांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. उरणच्या निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना गोडे, उरणचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र आव्हाड, न्हावा शेवाचे राजेश देवरे व मोरा सागरी पोलीस ठाण्याचे मुकुंद भोसले यांच्यासह विविध पक्षांचे नेते व संभाव्य उमेदवार यांची बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी निवडणुकीच्या काळात कोणते नियम आहेत, याची माहिती देण्यात आली. या बैठकीत ऑनलाइन अर्ज दाखल करण्याचीही माहिती देण्यात आली. खास करून निवडणुकीचा प्रचार करताना कोणतीही सभा विना परवाना होता कामा नये. याकडे लक्ष दिले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. तसेच सभेसाठी संबंधीत विभागांच्या परवानग्या २४ तास आधी घेतल्या पाहिजेत. निवडणुकीत चित्रफीत किंवा ध्वनीचित्रफितीच्या सहाय्याने प्रचार करायचा असल्यास त्याची एक प्रत प्रथम निवडणूक आयोगाकडे प्पाठवावी लागेल. त्यानंतरच त्याचा प्रसार करता येईल. आदी अटी व शर्तीची माहिती देण्यात आली. समाजमाध्यांचा वापर करीत असतांना त्याचा खर्च कसा सादर करावा असा सवाल उपस्थितांनी विचारला. याचे कारण सध्या काही मोबाइल कंपन्यांनी मोफत सेवा सुरू केल्याची माहिती देण्यात आली. याप्रश्नामुळे खर्चाची समस्या निर्माण झाली आहे.