नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकांऱ्याची गुणवत्ता ही अन्य पालिकेतील अधिकांऱ्याहून अधिक आहे; परंतु पालिकेतील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात कुणीतरी दुरावा निर्माण करीत आहे. त्यामुळे पालिकेतील सौहार्दाच्या वातावरणावर त्याचा परिणाम होत असल्याचा टोला गणेश नाईक यांनी लगावला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या बस दिनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, पालिकेत जाती-धर्माचे राजकारण करण्यात येत आहे; पंरतु ते थांबवता आले पाहिजे.
या वेळी महापौर सुधाकर सोनवणे, आमदार संदीप नाईक, नरेंद्र पाटील, आयुक्त दिनेश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
परिवहन सेवेच्या बसने लोकप्रतिनिधी आणि पालिकेच्या अधिकांऱ्यानी प्रवास केल्यास चालक आणि वाहकांच्या मानसिकतेत फरक पडेल. प्रवाशांशी ते सौजन्याने वागू लागतील, असा सल्ला महापौरांनी दिला.
आमदार नरेंद्र पाटील यांनी एनएनएमटीच्या बसगाडय़ांना लाल रंगापेक्षा विविध रंग लावल्यास वैविध्य निर्माण होईल. मार्गानुसार रंग असल्यास प्रवाशांवर त्याची वेगळी छाप पडेल, असे सांगितले. या वेळी लोकप्रतिनिधींनी बसमधून प्रवास केला.