दारूच्या नशेत असलेल्या वडिलांना मुलाने रागाच्या भरात मारहाण केल्याने वडील खाली पडल्याने जखमी होऊन मृत पावल्याची घटना घणसोली सेक्टर १६ मधील आशा अपार्टमेंट इमारतीत घडली. दशरथ चास्कर असे या घटनेत मृत पावलेल्या वडिलांचे नाव असून रबाले पोलिसांनी वडिलांना मारहाण करणाऱ्या सागर चास्कर या मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत दशरथ चास्कर हे घणसोली सेक्टर १६ मधील आशा अपार्टमेंटमध्ये कुटुंबासह राहण्यास होते. दशरथ यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे ते नेहमी सर्वाकडे पैसे मागून दारूपीत असत. त्यानंतर ते घरातील सर्वाना त्रास देत असे. त्यामुळे त्यांच्या घरांमध्ये नेहमी भांडण होत असत. रात्री चास्कर यांचे कुटुंबीय लग्नानिमित्त बाहेर गेले होते. या दरम्यान दशरथ चास्कर घरीच होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्यांचे कुटुंबीय घरी परतल्यांनतर दशरथ चास्कर यांनी आपल्या मुलासह इतरांशी भांडण काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याचा मुलगा सागर चास्कर याने रागाच्या भरात त्यांना मारहाण केली. या मारहाणीत चास्कर खाली पडून गंभीर जखमी झाल्याने त्यांना पालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे गेल्यांनतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृत चास्कर यांच्या डोक्यावर व कपाळावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्याने त्यांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला. त्यामुळे रबाले पोलिसांनी मृत दशरथ यांचा मुलगा सागर यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.