पोलिसांचा वचक झुगारत पनवेलमध्ये सोनसाखळी चोरांनी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली. पनवेल परिसरात सोनसाखळी चोरांची टोळी या महिन्याच्या सुरुवातीपासून सक्रिय झाली होती, या चोरांनी लक्ष्मीपूजन व भाऊबिजेच्या दिवशीही महिलांची मंगळसूत्रे लुटण्याचे सत्र कायम ठेवले. पोलिसांना मात्र यातील एकाही चोरटय़ाला पकडण्यात यश आले नाही. हे दिवस चोरटय़ांसाठी सर्वाधिक लाभदायक ठरले तर या दहा घटनांतील एकाही चोरास पकडण्यास पनवेल पोलिसांना अपयश आले आहे.
रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांना या चोरांनी लक्ष्य केले आहे. भाऊबिजेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास पनवेलमधील लोकमान्य टिळक पथ येथे वेगवेगळ्या घटनांत चोरांनी दोन महिलांची मंगळसूत्रे हिसकावून पलायन केले.
पनवेल तालुक्यात या महिन्यात आतापर्यंत अशा दहा घटना घडल्या आहेत. या प्रकारानंतर टिळक पथाच्या नाक्यांवर पोलिसांनी बैठा पहारा ठेवला आहे, मात्र हा प्रकार म्हणजे ‘बैल गेला व झोपा केला’, असा असल्याची चर्चा परिसरात आहे. सोनसाखळी चोरांना पोलिसांचे भय वाटत नसल्याबद्दलही सर्वसामान्य नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. खारघरमध्येही या महिन्यात अशा प्रकारच्या पाच घटना घडल्या आहेत.