आयुक्तांचा निर्णय रद्द; आंबेडकर स्मारकाबाबत लवकरच निविदा
ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या घुमटावर संगमरवरी आच्छादन न लावण्याच्या नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला शिवसेना वगळता सर्व पक्षांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे १९ कोटी रुपये खर्चून घुमटावर ठरल्याप्रमाणे संगमरवर लागणार आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संगमरवरी आच्छादनासंदर्भात आयआयटीकडून अहवाल मागविला होता. यात समुद्रकिनारी संगमरवरी आच्छादनावर वातावरणातील परिणाम होऊन तो काळा पडण्याची शक्यता असते. त्याऐवजी घुमटांना पांढरा रंग मारण्याचा निर्णय घेतला. यावर मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेविका हेमांगी सोनावणे यांनी लक्षवेधी मांडली. तर यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांच्या निर्णयाला विरोध करीत स्मारकाच्या घुमटावर संगमरवरी आच्छादन लावण्याची मागणी केली. त्यावर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्मारकाला तसे आच्छादन लावण्यास मान्यता देऊन लवकरच यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्याचे सूतोवाच केले. महापौर सुधाकर सोनवणे यांनी २१ दिवसांत तांत्रिक माहिती घेऊन निविदा काढण्याचे सूचित केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या घुमटावर संगमरवरी आच्छादन लावण्यास पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विरोध केला होता. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीशिवाय निर्णय बदलल्याने याचे पडसाद मासिक सभेत उमटले. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांवर टीकेची झोड उठवत या निर्णयाला कडाडून विरोध केला.
यावेळी प्रेक्षकगृहामध्ये आयुक्तांच्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजी करीत निषेध केला. मुंढे यांनी स्मारकाच्या घुमटावर संगमरवरी आच्छादन तांत्रिक दृष्टया योग्य नसल्याचे कारण पुढे करत ही प्रक्रिया रद्द केली होती. आयुक्तांनी या निर्णयाविरुद्ध उद्रेकाला समोरे जावे लागेल, अशी जोरदार टीका हेमांगी सोनवणे यांनी केली. तर तांत्रिक अहवाल स्मारकांसाठी जलदगतीने मागवितात; मात्र मोडकळीस आलेल्या इमारतीचे अहवाल सादर होऊनही या इमारतींच्या पुनर्बाधणीस परवानगी देणाऱ्या टाळाटाळ करीत आहेत याकडे नगरसेवक संजू वाडे यांनी लक्ष वेधले. शिवसेनेचे नगरसेवक एम. के.मढवी या विषयावर आपली भुमिका मांडत असताना सभागृह नेते जे.डी.सुतार यांनी टोमणे मारल्यावर मढवी यांच्या पत्नी विनया मढवी या सुतार यांच्या अंगावर धावून जात असल्याने सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला होता. आयुक्तांच्या वर सर्वपक्षीय नेत्यांनी तोंडसुख घेतले. महापौर सुधाकर सोनवणे यांनी देखील मला कामकाज शिकवू नका असा टोला थेट आयुक्तांना मारला. शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी मात्र आयुक्तांच्या कारभाराची लक्तरे काढल्याने शिवसेनेत समन्वय नसल्याचे समोर आले आहे. या सर्व गोंधळा नंतर आयुक्तांनाही भूमिकेवर ठाम राहत संगमरवरी आच्छादन लावयाचे असल्यास तुम्ही लावू शकता, असा निर्णय जाहीर केला.