कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे गेली चार वर्षे रखडलेली नवी मुंबईतील पहिली मेट्रो आता या वर्षांअखेर धावणार आहे. बेलापूर रेल्वे स्थानक ते तळोजा पेंधर दरम्यानच्या ११ किलोमीटर अंतराच्या मेट्रोचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गातील तीन किलोमीटर अंतरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच चाचणी केली जाणार असून तीन ते चार महिन्यांनी ही मेट्रो प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहे.

महामुंबई क्षेत्रात सिडकोने पाच मेट्रो मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील बेलापूर ते पेंदार हा ११ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम मे २०१२ रोजी सुरू करण्यात आले आहे. त्या वेळी हा मार्ग पहिल्या तीन वर्षांत पूर्ण होईल असे जाहीर करण्यात आले होते; पण या संपूर्ण मार्गाचे काम एकाच कंत्राटदाराला देण्यात आल्याने मध्यंतरी हा प्रकल्प रखडला होता. त्यामुळे पहिल्या तीन वर्षांत होणाऱ्या या मार्गाला आत सात वर्षे लागली आहेत.  केंद्र व राज्य सरकारच्या दृष्टीने नवी मुंबईतील विमानतळाचा प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी असल्याने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले होते. धिम्या गतीने चालणाऱ्या या कामाला गती देण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी हे काम चार कंत्राटदारांना विभागून दिल्याने त्याला आता वेग आला आहे. या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या दोन मार्गिकांवरील सहा डब्यांची जोडणी खारघर येथील कारशेडमध्ये करण्यात आली आहे. या मार्गावरील ११ स्थानकांचे काम अद्याप सुरू असून ते येत्या काळात होईल, असा दावा सिडकोच्या वतीने केला जात आहे.

या मार्गावरील शीव-पनवेल मार्गावर उभारण्यात येणाऱ्या मेट्रो उड्डाणपुलाचे आव्हानात्मक काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे हा मार्ग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मार्गावर तीन किलोमीटर अंतराची मेट्रो रेलची चाचणी पूर्ण झाल्यानंतर पुढील काही महिने या मार्गावर मेट्रो रेल्वेची वारंवार चाचणी घेतली जाणार असून त्यानंतरच ती प्रवाशांच्या सेवेस रुजू केली जाणार आहे. तीन हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पानंतर विमानतळाला जोडणाऱ्या मार्गासह आणखी चार मेट्रो मार्ग सुरू होणार असून कल्याणला जोडली जाणार आहे.

दक्षिण नवी मुंबईतील घरांची मागणी वाढणार

बांधकाम क्षेत्रात कमालीची तंगी आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने ९४ हजार घरांचा प्रकल्प जाहीर केला आहे. नवी मुंबईच्या दक्षिण भागात विकासाला हातभार लागावा यासाठी मेट्रो सेवा फायदेशीर ठरणार आहे. विमानतळ प्रकल्पाअगोदर ही सेवा सुरू होत असल्याने दक्षिण नवी मुंबईतील घरांची मागणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बेलापूर ते पेंदार या मेट्रो मार्गाचे काम प्रगतिपथावर असून तीन किलोमीटर अंतरात मेट्रो रेल्वेची ‘ट्रायल रन’ घेतली जाणार आहे. त्यानंतर पुढील काही काळ मार्गाच्या कामाबरोबरच मेट्रोची चाचणी सुरू ठेवली जाणार आहे. त्यामुळे या मार्गात येणाऱ्या अडचणी लक्षात येणार आहेत. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर हा मार्ग सुरू करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

– संजय चौटालिया, मुख्य अभियंता, सिडको