|| संतोष जाधव

शीव-पनवेल महामार्गाला समांतर असणाऱ्या उरण फाटा ते तुर्भेपर्यंतच्या रस्त्याच्या ४३ कोटींच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. महापालिका प्रशासनाने ही माहिती मंगळवारी दिली.

उरण फाटा ते तुर्भे रस्त्याच्या दुरवस्थेवरून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली होती. त्यामुळे सुरुवातीला ३८ कोटींच्या कामाची रक्कम ४३ कोटींवर पोहोचली. त्यामुळे या वाढीव खर्चाची जबाबदारी स्थायी समिती सदस्यांची असल्याचे आयुक्तांनी वाढीव खर्चासह मंजुरीसाठी आणलेल्या प्रस्तावात टिप्पणी केली होती. त्यामुळे प्रशासन व स्थायी समिती यांच्यात वादंग वाढला होता. त्यानंतर हा प्रस्ताव पुन्हा अभियंता विभागाने मंजुरीसाठी महासभेत पाठवला व त्यानंतर स्थायीच्या मंजुरीनंतर आचारसंहितेमुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नव्हती. परंतु आता या रस्त्याच्या कामाच्या ठेकेदाराबरोबर करारनामा करण्यात आला असून काही दिवसातच या कामाबाबत कार्यादेश  काढण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता विभागाने दिली. दरवर्षी पावसाळ्यात शीव-पनवेल महामार्ग खड्डय़ांनी भरलेला असतो. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. पालिका हद्दीतून जाणारा वाशी ते बेलापूर दरम्यानचा शीव पनवेल महामार्ग पालिकेकडे हस्तांतर करण्याचा प्रस्तावही महापालिकेत मंजूर करण्यात आला होता. परंतु हा प्रस्ताव राज्य शासनाच्या लालफितीत अडकला आहे. तर दुसरीकडे या महामार्गाच्या उरणफाटा ते तुर्भे एस. के. व्हीलपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण रखडल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. उरण फाटा ते एस के व्हीलपर्यंतचा महामार्गाला हा समांतर असलेल्या चार किलोमीटरच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम करण्यात येणार आहे.

शीव पनवेल महामार्गाला समांतर असलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात येणार. संबंधित ठेकेदाराला कार्यादेश देण्यात येतील.

   – सुरेंद्र पाटील, शहर अभियंता