आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्याकडून भूखंडाची पाहणी
राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी उरणमधील प्रस्तावित रुग्णालयाच्या भूखंडाला भेट देऊन पाहणी केली. त्यामुळे १० वर्षांपासून अत्याधुनिक रुग्णालयाची केलेली प्रतीक्षा संपणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
उरण तालुक्यात अनेक वर्षांपासून तीस खाटांचे एक रुग्णालय आहे. परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक समस्यांनी ते ग्रासलेले आहे. उरणमध्ये दररोज होणाऱ्या अपघातातील जखमी तसेच गंभीर रुग्णांवर तातडीच्या उपचारासाठी मुंबई, नवी मुंबई किंवा पनवेल गाठावे लागते. अनेक रुग्णांना या प्रवासादरम्यानच आपले जीव गमवावे लागतात. या रुग्णालयात उपचारावर बंधने येत असल्याने दहा वर्षांपूर्वी शासनाकडे उरणसाठी शंभर खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारावे, अशी मागणी करण्यात आलेली होती. रुग्णालयाला शासनाकडून दोन वर्षांपासून मान्यताही देण्यात आलेली आहे. असे असले तरी प्रत्यक्षात मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती. उरणच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. त्यामुळे उरण तालुक्यात शंभर खाटांचे सर्व सुविधांनी युक्त असे रुग्णालय उभारण्याची मागणी उरण सामाजिक संस्थेसह इतर सामाजिक संस्थांनीही केली होती. यामध्ये किमान शंभर खाटा, ११० कर्मचारी, १२ वैद्यकीय अधिकारी तसेच अत्याधुनिक उपकरणे यांचा समावेश आहे. याकरिता सिडकोकडून शासनाला ६ हजार स्क्वेअर मीटरची जागा व दोन चटईक्षेत्र देण्याचे मान्य केले आहे. याचा पाठपुरावा उरणचे आमदार मनोहर भोईर यांनी केला आहे. त्यासाठी सिडको तसेच आरोग्य विभाग व आरोग्यमंत्र्याशी संपर्क साधून बैठका घेऊन लवकरात लवकर रुग्णालयाची उभारणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी रुग्णालयाच्या भूखंडाची प्रत्यक्ष पाहणी करून आरोग्य विभागाने तातडीने कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. या वेळी सिडकोचे द्रोणागिरी विभागाचे अधीक्षक अभियंता आर.एस.नाईक, आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बाविस्कर आदी उपस्थित होते. रुग्णालयाच्या भूखंडाचे ८४ लाख रुपये सिडकोकडे जमा करावयाचे आहेत. त्यातील सिडकोने मागणी करूनही शासनाकडून दहा टक्केही रक्कम वर्षभरात सिडकोकडे आजपर्यंत जमा केलेली नाही.