केरळ, तमिळनाडूतून आवक सुरू, कोकणातील आंबा फेब्रुवारीत

देशातील सर्वात मोठी फळ बाजारपेठ असलेल्या मुंबईतील खवय्यांना यंदा दक्षिण आफ्रिकेतील चवदार हापूस आंबा चाखता यावा, यासाठी काही व्यापाऱ्यांनी केलेल्या तयारीवर केंद्रीय कृषी मंत्रालयातील आयात विभागाने पाणी फेरले आहे. त्यामुळे हॉट वॉटर ट्रीटमेंट करून प्रायोगिक पातळीवर २०० डझन हापूस आंबे मुंबईकरांना देण्याच्या व्यापाऱ्यांच्या तयारीला सुरुंग लागला आहे. आयात करण्याची परवानगी आम्ही आमच्या सोयीनुसार देऊ, असे या विभागाने कळविल्याने व्यापाऱ्यांनी आयातीचा नाद सोडून दिला आहे. याच काळात आता केरळ व तामिळनाडू येथील हापूस आंब्याची आवक सुरू झाल्याने दक्षिण आफ्रिकेची आयात रद्द करण्यात आली आहे. दोन दिवसांपासून आंब्याच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. कोकणात यंदा हापूस आंब्याची दुसऱ्या टप्प्यातील लागवड चांगली असल्याने हापूस खवय्यांना चांगली मेजवानी मिळणार आहे.

तुर्भे येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारात यंदा दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा आणण्याची तयारी काही व्यापाऱ्यांनी सुरू केली होती. दक्षिण आफ्रिकेचा हापूस आंबा सध्या आखाती देशांत मागणी असल्याने नियमितपणे आयात केला जात आहे. चव व आकाराला साधारपणे कोकणातील हापूस आंब्याशी साधम्र्य असणारा हा हापूस आंबा ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान तेथील बाजारात विकला जात असल्याने मुंबईतील आयात निर्यात फळ व्यापाऱ्यांनी यंदा त्याची मुंबईत विक्री करण्याची योजना आखली होती. जेमतेम तीन महिने बाजारात असणाऱ्या या हापूस आंब्याच्या एक डझनाच्या २०० पेटय़ा प्रायोगिक पातळीवर मागवण्यात आल्या होत्या पण त्याला केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पणन विभागाने खो घातला आहे. ही परवानगी मिळण्याची वाट पाहणाऱ्या व्यापाऱ्यांनी आयात होणाऱ्या हापूस आंब्यासाठी हॉट वॉटर ट्रीटमेंट (उष्ण जल प्रक्रिया) करण्याची तयारी देखील दाखवली होती. मुंबईतील अनेक व्यापाऱ्यांची फळे, भाज्या युरोपात निर्यात होत आहेत. यावर विविध प्रकारच्या प्रक्रिया करून ती पाठविली जातात. भारतात येणाऱ्या फळ अथवा भाजीवर अशी प्रक्रिया करण्याची अट नाही पण दक्षिण आफ्रिकेतील शेतमालावर प्रक्रिया करण्याची तयारी व्यापाऱ्यांनी दाखवून देखील केंद्रीय पणन विभागाने आयातीची ही परवानगी देण्यास विलंब केला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील चवदार हापूस आंब्याला मुंबईकर यंदा मुकले आहेत. या परवानगीच्या प्रतीक्षेत असतानाच केरळ व तामिळनाडू येथील हापूस आंबा मागील दोन दिवसांपासून नियमित येण्यास सुरुवात झाली आहे.

गेल्या वर्षी कर्नाटकच्या हापूस आंब्याने कोकणातील हापूस आंब्याला तगडे आव्हान दिले होते. दक्षिण भारतातील या हापसू आंब्याची आवक् सुरू झाली आहे. कोकणातील हापूस आंब्यांना यंदा चांगला मोहर आला असून दुसऱ्या टप्प्यातील मोहराला फळधारणा धरली आहे. यंदा कोकणातूनही हापूस आंब्याची चांगली आवक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दक्षिण आफ्रिकेतील हापूस मुंबईत आणण्याची तयारी केली होती. २०० डझन आंबे आणले जाणार होते. त्यासाठी केंद्रीय पणन विभागाची परवानगी मागितली गेली होती. सर्व कागदपत्र दाखल करण्यात आली होती. हॉट वॉटर ट्रीटमेंट करण्याचीही तयारी दर्शवली होती पण परवानगी देण्यास टाळाटाळ केल्याने आंबा येऊ शकला नाही. याच काळात दक्षिण भारतातील हापूस आल्याने ही योजना आम्ही रद्द केली आहे.

संजय पानसरे, माजी संचालक, घाऊक फळ बाजार, एपीएमसी