पाश्चिमात्य पद्धतीचे पदार्थ तरुणाईच्या खास पद्धतीचे पण पारंपरिक पदार्थाना पाश्चिमात्य तडका देऊन ते एका वेगळ्या स्टाईलने तरुणाईसमोर ठेवले तर.. आहा! त्या पदार्थावर तरुणाई हमखास ताव मारणार. दाक्षिणात्य पारंपरिक इडली, डोसा हा आता नाश्त्यापुरता मर्यादित नाही तर त्यावर नवनवीन प्रयोग करून तरुणाईच्या ‘ब्रंच’ स्टेटमेंटमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नेरुळ सेक्टर-२ मधील डोसा प्लाझा हे पारंपरिक डोशांचं फ्युजन करणारं असंच एक छोटेखानी कॉर्नर. जागा कितीही छोटी अथवा मोठी असो वा ठिकाण कोणतेही असो तेथील पदार्थाची चव जर खास असेल तर खवय्यांचा ओढा तिथे आपसूकच असतो. याचाच प्रत्यय या कॉर्नरमध्ये गेल्यावर येतो.

मूळच्या तामिळनाडूमधल्या मुर्गेश कोनार व शिवण कोनार यांच्या हातची अस्सल पांरपरिक चव आपल्याला पाश्चिमात्य पद्धतीमध्ये चाखायला मिळते. डोशाचे तब्बल १०४ प्रकार आपल्याला चाखायला मिळतात. त्यातही अमेरिकन क्रिस्पी डोसा आणि सॅलड रोल डोसा ही डोसा प्लाझाची खासियत. याशिवाय अमेरिकन सॅलड रोल, पनीर क्रिस्पी,अमेरिकन डिलाइट, शेझवान डोसा, पनीर चिली डोसा यांसारखे डोशांचे विविध प्रकार येथे मिळतात. ४ फूट मोठा पेपर डोसाही इथे बनवून मिळतो. इडलीतही मन्चुरियन इडली, स्पेशल मिनी इडली असे प्रकार खवय्यांच्या दिमतीला सज्ज आहेत.

येथील सांबारही वैशिष्टय़पूर्ण असते. ते तामिळनाडू स्पेशल सांबर म्हणून प्रसिद्ध आहे. साधारणत: सांबारची चव गोड असते, परंतु तामिळनाडू स्पेशल सांबार हे चवीला आंबट असते. यासाठी तूरडाळ, मूगडाळ, शेवग्याच्या शेंगा, भोपळा, गाजर, वांगी, टोमॅटो वापरले जाते. दाक्षिणात्य खासियत तरीही पाश्चिमात्य टच असल्याने एसआयईएस, डी वाय पाटील या जवळच्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची झुंबड इथे असते. या कॉलोजियन्सच्या गलक्यामुळे इथले वातावरणही प्रसन्न असते असे मुर्गेश आणि शिवण सांगतात. हे दोघे चुलतभाऊ शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांच्या वर्तमानपत्रांच्या एजन्सीमध्ये काम करायचे. पण दोघांनाही खाण्याची प्रचंड आवड त्यामुळे या दोघांनी नेरुळ येथील स्टेशन परिसरात २००८ साली स्टॉल टाकला. व्यवसाय सुरू होऊन एक वर्ष होऊनही उत्पन्न होत नसल्याने त्यांनी २००९ साली सेक्टर-३ येथे डोसा प्लाझा हे कॉर्नर सुरू केले. आता त्यांच्याकडे चार  प्रशिक्षित कुक कामाला आहेत. डोशासाठी रोज दोन किलो तर इडलीसाठी पाच किलोचे तांदूळ, डाळीचे मिश्रण दुकानातच बनविण्यात येते. स्टफिंगसाठी वापरला जाणारा मसाला ही येथील खासियत आहे. शेझवान, गार्लिक, महाराजा मसाला स्टफिंगसाठी वापरला जातो. किंमत माफक असल्याने तरुणाईचे नाश्त्याचे ठिकाण म्हणून या कॉर्नरला पसंती मिळते आहे. मागणीनुसार नेरुळ पूर्व व पश्चिम परिसरांत होम डिलिव्हरीची सोयदेखील आहे.

डोसा प्लाझा

  • कधी- सकाळी ८ ते रात्री १० वा.
  • कुठे- एफ-१, शॉप नं-१३, पॅराडाइस अपार्ट. सेक्टर-३, एसआयईएस महाविद्यलयाच्या समोर, नेरुळ.