खारघरमधील ‘स्पॅगेटी’च्या रहिवाशांसाठी प्राणवायू संचिका

नवी मुंबई : टाळेबंदीत अनेक गृहसंस्थांमधील वाद विकोपाला गेले आहेत, तर काही संस्थांनी मनमानी सुरू केल्याची उदाहणे समोर येत आहेत. परंतु, यात काही गृहसंस्था  इतरांसाठी आर्दश निर्माण करीत आहेत. खारघरमधील सिडकोने उभारलेल्या स्पॅगेटी सहकारी गृहसंस्थेतील रहिवाशांनी करोना संकट परतवून लावण्यासाठी  रहिवाशांसाठी प्राणवायूच्या दहा संचिका उपलब्ध करून दिल्या आहेत. बाधित रुग्णाला या तात्पुरत्या सुविधेमुळे संजीवनी मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

सिडको क्षेत्रातील सुमारे पाच हजार गृहनिर्माण संस्थांसाठी मार्च महिन्यातच सिडको निबंधकांनी काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. यात गृहसंस्थेत प्रवेश करणाऱ्या सदस्यांना तापमान मोजण्यासाठी थर्मल गन, प्राणवायूचे गणन करणारे मीटर आणि जंतुनाशके उपलब्ध करण्याचे आवाहन करण्यात आले होते. अनेक गृहनिर्माण संस्था या आदेशाचे पालन करीत आहेत. मात्र, काही गृहसंस्थेतील पदाधिकाऱ्यांनी प्रवेश बंदी लागू केली आहे. यात वृत्तपत्र विक्रेत्यांना आजही गृहनिर्माण संस्थांमध्ये परवानगी दिली जात नाही. तर काही पदाधिकाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाही आडकाठी घातलेली आहे. खारघर सेक्टर १५मधील स्पॅगेटी सहकारी गृहसंस्थेने या संकटकाळात जास्तीत जास्त समन्वय आणि एकोपा साधण्याचे काम केले आहे. सिडकोने २००५मध्ये  ४५६ घरांचे संकुल उभारले होते.  या संस्थेतील सदस्य संकट काळात कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यावर चिंतन केले जात आहे. त्यामुळे संस्थेच्या प्रवेशद्वारावरच प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. करोना साथ रोगाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस पनवेल पालिका क्षेत्रात वाढत आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याची जबाबदारी स्पॅगेटीच्या सदस्यांनी उचलली आहे. करोनाचा सर्वाधिक धोका हा अस्थमा, मधुमेह, रक्तदाब आणि हदयविकार आणि इतर आजार असलेल्या रुग्णांना जास्त आहे हे ओळखून संस्थेने दहा प्राणवायूच्या संचिका विकत घेतल्याची माहिती माहिती सचिव यशवंत देशपांडे यांनी दिली.

अडचणींवर मात

खारघरमधील ही गृहसंकुल शहरापासून तसे थोडे दूर आहे. त्यामुळे या ठिकाणी रुग्णवाहिका येण्यास विलंब होत असल्याचे पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्पुरती सेवा म्हणून संचिका घेतल्या आहेत. रुग्णालयात खाटा मिळण्याच्या अनेक अडचणी आहेत. तोवर रुग्णाला प्राणवायूचा पुरवठा संजीवनी ठरत आहे. १२० ग्रॅम वजनाच्या प्राणवायूच्या संचिका वाहतूक करणेही सुलभ होत असल्याचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले.