सरकारी नियम डावलणाऱ्या खासगी रुग्णालयांवर विशेष समितीची नजर

नवी मुंबई</strong> : नागरिकांना आरोग्य सुविधा योग्य दरात सुलभरीत्या उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने परिपत्रक जारी केले आहे. पालिकेने सर्वसामान्य नागरिकांना देयक रकमेत काही अडचण आल्यास त्या निवारणासाठी ‘विशेष लेखा परीक्षण समिती’ स्थापन केली आहे. याच वेळी एका नागरिकाने ‘फोर्टीस’ रुग्णालयाने अदा केलेले देयक आणि उपचारातील हलगर्जीबाबत कारवाईची मागणी केली आहे.

‘बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अ‍ॅक्ट १९५०’ अन्वये ज्या सार्वजनिक धर्मादाय संस्था नोंदणीकृत आहेत आणि रुग्णालये, नर्सिग होम, प्रसूती केंद्रे, दवाखाने वा इतर वैद्यकीय मदत केंद्रे चालवत आहेत आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांहून अधिक आहे, अशा संस्थांना राज्य अनुदानित सार्वजनिक संस्था (स्टेट एडेड पब्लिक ट्रस्ट) म्हणून मान्यता आहे. अशा संस्थांनी रुग्णालयातील एकूण खाटांच्या दहा टक्के खाटा राखीव ठेवायच्या आहेत. याशिवाय याबाबत तसेच सर्वसामान्य रुग्णांकडून खासगी रुग्णालय मोठय़ा रकमेची देयके आकारत असल्याच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर केल्या जात आहेत.

परिपत्रकानुसार करोना नसलेल्या आणि करोनाबाधित असलेल्या रुग्णांवरील उपचारासाठी आकारायचे सेवानिहाय दरपत्रक जाहीर केले आहे. त्या परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे अधिकार पालिका क्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून महापालिका आयुक्त यांना प्रदान करण्यात आले आहेत. मात्र, आजवर पालिका क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात अवाजवी देयकांच्या तक्रारी केल्या जात आहेत. यात फोर्टीस रुग्णालयाची हलगर्जी आणि अवाजवी देयकांबाबत संबंधित रुग्णालयावर पालिकेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे गजानन काळे यांनी केली आहे.

कार्यवाही अशी

* याआधीची चार सदस्यीय समिती रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी विशेष लेखा परीक्षण समिती काम करीत आहे. या माध्यमातून रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या देयकांबाबत तसेच महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेनुसार काम होत असल्याबाबत तपासणी करून अहवाल देण्यात येईल. यासाठी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या अध्यक्षतेखाली हे काम चालणार आहे.

* तक्रार मिळाल्यानंतर ७२ तासांत समिती याबाबतचा अहवाल सादर करणार आहे. यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यास कारवाईची शिफारस करेल. त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

* नवी मुंबई पालिका स्तरावरील या विशेष लेखा परीक्षण समितीकडे moh@nmmconline.com या इ मेल वर अथवा प्रत्यक्ष अर्ज सादर करावा तसेच याविषयी अधिकच्या माहितीसाठी ०२२-२७५६७२६१ यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

फोर्टीस रुग्णालयात उपचार घेण्यासाठी २० जून रोजी दाखल झालो होतो. त्यानंतर मला बरे वाटत असतानाही मला पुन्हा चाचण्या करून अहवाल मिळण्यापूर्वीच सोडण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. त्यानंतर माझी चाचणी सकारात्मक आली. फोर्टीस रुग्णालयाने माझ्या हाती भरमसाठ देयक ठेवलेच. पण, उपचारांतील हलगर्जीही मला सोसावी लागली. याविरोधात मी पालिकेकडे तक्रार केली आहे. त्यांच्याकडून न्याय मिळेल, अशी आशा आहे.

   -तक्रारदार नागरिक

फोर्टीस रुग्णालयाबाबत संबंधित व्यक्तीने लेखी तक्रार द्यावी.त्याबाबत कागदपत्रांची छाननी व बिलांची तपासणी करून योग्य जर काही चुकीचे आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.      डॉ.राहुल गेठे, उपायुक्त