उद्योजक : वसंत वर्तक

औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना लागणारे विविध प्रकारचे रंग बनविण्याचे काम रबाले येथील ‘स्पेक्ट्रम’ या कारखान्यात गेली ३८ वर्षे सातत्याने केले जात आहे. या व्यवसायात देश-विदेशातील अनेक छोटे-मोठे कारखाने असल्याने गुणवत्ता, सेवा, आणि तत्परता या गुणांवर ‘स्पेक्ट्रम’ टिकून आहे. राज्यातील व्होल्टास, गोदरेज आणि क्रॉम्प्टनसारख्या बडय़ा कारखान्यांबरोबर शंभर एक छोटय़ा-मोठय़ा कारखान्यांना लागणारा रंग बनवून देण्याचे काम ‘स्पेक्ट्रम’ करीत आहे. तीन उद्योगशील तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या कारखान्याची धुरा आता वर्तक-पटवर्धन जोडी मोठय़ा हिमतीने सांभाळत आहे.

कारखान्यातील यंत्रसामग्री, टँक, व्हिसिल, ट्रान्सफार्मर, स्ट्रक्चरल स्टील, ऑडिओ सीडी, डीव्हीडी, टीव्ही संच, इलेक्टॉनिक्स वस्तू, स्टील फर्निचर यांना कधीही न निघणाऱ्या रंगाला बाजारात मोठी मागणी आहे. देशात सुमारे दोन हजार छोटे-मोठे कारखाने ही मागणी तसा पुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. बी. एस्सी.पर्यंत शिक्षण घेऊन चेंबूर येथील एका कारखान्यात चार वर्षे नोकरी केल्यानंतर स्पेक्ट्रमचे भागीदार वसंत वर्तक यांना त्यांचे उद्योगी मन स्वस्थ बसू देईना. दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा स्वकर्तृत्वाची परीक्षा घेण्याचे वर्तक यांनी १९७९ मध्ये ठरविले. औद्योगिक साहित्यासाठी रंग बनविणाऱ्या कारखान्यातील अनुभव गाठीशी असल्याने त्याच उत्पादनाचा कारखाना सुरू करण्याचा विचार पक्का करण्यात आला.

सुरुवातीला भांडवलाच्या प्रश्नाने ग्रासले होते. शोधलं की सापडते या म्हणीप्रमाणे उद्योग सुरू करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर वर्तक यांच्या भावाच्या माध्यमातून एस. आर. पटवर्धन यांची ओळख झाली. या दोन मराठी माणसांच्या मदतीला नंतर सुंदर नवानी हा सिंधी माणूस धावून आला. तिघांनी मिळून रबाले येथे एमआयडीसीकडून एक लाख रुपयात एक शेड घेतली. त्या वेळी नवी मुंबईत एखादा कारखाना सुरू करायचे म्हणजे एक मोठे दिव्य होते पण उद्योग करण्याच्या हेतूने झपाटलेल्या वर्तक यांनी नवी मुंबईत जाण्याची तयारी केली.

सुमारे पाच हजार चौरस फूट क्षेत्रफळात स्पेक्ट्रमचा कारखाना सुरू झाला. इपॉक्सी, पीयू पेंट, ड्रम पेंट, अ‍ॅक्रेलिक पेंट, उष्णता प्रतिबंधक, रबर, मेटल अशा सर्व प्रकारच्या रंगाची निर्मिती या कारखान्यात सुरू झाली. नावाप्रमाणेच सप्तरंगांची निर्मिती करणाऱ्या या कारखान्यांना काही वर्षांतच आपला विस्तार खैरणे, रबाले येथे केला. रंगाच्या या दुनियेत अनेक बडे कारखाने तळ ठोकून आहेत. मोठमोठय़ा सिने अभिनेत्यांना घेऊन करण्यात आलेल्या जाहिराती, मोठे प्लँट, कर्मचाऱ्यांचा ताफा आणि किंमत युद्धात टिकून राहणे म्हणजे एक मोठा संघर्ष स्पेक्ट्रम गेली अनेक वर्षे करीत आहे. केवळ तत्पर सेवेच्या बळावर आम्ही हे शिवधनुष्य पेलले असल्याचे वर्तक मोठय़ा अभिमानाने सांगतात. बडय़ा कारखान्यांकडून औद्योगिक रंग घेताना अनेक सोपस्कार पार पाडावे लागतात.

मागणी केल्यानंतरही हा माल वेळेत मिळेल याची कोणतीही खात्री नाही. अशा वेळी एक विश्वासार्ह नाव म्हणून स्पेक्ट्रमच्या रंगाला उद्योजक पसंती देत असल्याचे वर्तक-पटवर्धन ही जोडी अभिमानाने सांगतात. विशेष म्हणजे वर्तक यांनी साठी पार केलेली आहे. त्यांच्या जोडीला शरद पटवर्धन यांचा मुलगा शैलेश पटवर्धन बी. ई. केमिकल्स व एबीएची पदवी घेऊन या उद्योगात उतरला आहे. वर्तक उत्पादन सांभाळत आहेत तर पटवर्धन मार्केटिंगचे फंडे आत्मसात करीत आहेत. रंगाच्या दुनियेतील माणसांनी नेहमीच कलरफुल राहिले पाहिजे, असे सांगत वर्तक यांनी या व्यवसायाचा आणखी विस्तार करण्याचा संकल्प सोडला आहे.