मंत्रालयातील बैठकीत बबनराव लोणीकर यांचे निर्देश

पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना वेळेत व पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या हद्दीतील पाणीपुरवठा योजनांना गती देण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले. पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते.

‘पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील पाणीपुरवठा योजना सुरळीत ठेवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. जलवाहिन्या जुन्या झाल्याने पाणीगळती वाढली आहे. गळती रोखण्यासाठी एका महिन्यात प्रयत्न केले जातील. या योजनांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा क्रमांक-३ तयार करण्यात आला असून योजनेची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे,’ अशी माहिती लोणीकर यांनी दिली.

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, पालिकेचे सभागृह नेता परेश ठाकूर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पनवेलमध्ये साधारण फेब्रुवारीपासूनच पाण्याची चणचण भासू लागते. पालिका, एमआयडीसी आणि जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवाठा करण्यात येऊनही तो अपुरा ठरू लागतो.