वाढत्या वजनाचा बागुलबुवा भेडसावू लागल्यापासून सॅलडचे वाढलेले महत्त्व विचारात घेऊन वाशीतील कुणाल मट्टू यांनी केवळ सॅलडला वाहिलेले हॉटेल सुरू केले. नाव दिले ‘सॅलड बार’. वाशीतील सेक्टर ३० मध्ये थाटण्यात आलेला हा आगळावेगळा बार देश-विदेशातील भाज्यांशी त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण चवींशी आणि पौष्टिक गुणधर्माशी आपली ओळख करून देतो.

उन्हाचा तडाखा बसत असताना मांसाहार, तेलकट-तिखट, चमचमीत पदार्थ वज्र्य करून सहज पचणारे आणि शरीरातील उष्णतेला पळवून लावणाऱ्या पदार्थाचा शोध अनेकांनी सुरू केला असेल. तुमची धाव जर आइस्क्रीम, गोळा, सरबत, शीतपेये इथपर्यंतच पोहोचत असेल, तर वाशीतील सॅलड बार ही तुमच्यासाठी मोठी मेजवानीच ठरेल.

नवी मुंबईत खास सॅलडसाठी कोणतेच हॉटेल नाही. इतर उपाहारगृहांमध्ये मिळणारी सॅलड्सही अगदी मोजकीच. त्यात वैविध्य नाही. हीच उणीव भरून काढण्यासाठी कुणाल मट्टू यांनी २०१४ साली वाशी येथील रेल्वे स्थानक परिसरात हे छोटेखानी हॉटेल थाटले. पॉपाय या काटरून कॅरॅक्टरचे नाव देऊन त्यांनी तयार केलेले पपईचे ‘पॉपाय सॅलड’ लगेच लोकप्रिय झाले. या सॅलडमध्ये गोड गुणकारी पपईसोबतच पौष्टिक पालकचाही वापर करण्यात आला आहे. त्यामुळे मुलेही खूश आणि पालकही समाधानी होतात.

येथे मिळणाऱ्या सॅलड्समध्ये चेरी टोमॅटो, मोड आलेली कडधान्ये, विनेगर, मध, काळीमिरी, चीझ यांचा अंतर्भाव असतो. हे पदार्थ वापरून बनवलेले कॅलिफोर्निया सॅलड हे त्यांचे वैशिष्टय़ असल्याचे कुणाल सांगतात. याशिवाय समर सॅलड, मिक्स बिन सॅलड, लीन सॅलड, बॅसिल कॉटेज चीज सॅलड, एशियन सॅलड, मसलमॅन सॅलड इत्यादी सॅलड्सही मोठय़ा प्रमाणात विकली जातात. सॅलडमधील तोचतोचपणा आणि सपक चव दूर करून वैविध्य आणि चटपटीतपणा आणण्याचा प्रयत्न इथे दिसतो. इथे सॅलड तयार करण्यासाठी चार प्रशिक्षित स्वयंपाकी ठेवण्यात आले आहेत.

येथे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असते. दुपारच्या जेवणाच्या वेळी अनेक जण येथे येऊन सॅलड्सचा आस्वाद घेतात. घणसोली व बेलापूर परिसरांत होम डिलिव्हरीची सोय देण्यात आली आहे. सॅलड्सशिवाय येथे उत्तम कॉफी मिळते. त्यात ‘फुल क्रिमी मिल्क’ वापरले जाते. ख्रिसमस, व्हॅलेंटाइन्स डे यांसारख्या खास दिवशी विशेष सवलती दिल्या जातात. हॉटेलचे व्यवस्थापक अमोल कुंभार सांगतात की, ‘इट गुड.. लिव्ह गुड’ हे आमच्या हॉटेलचे ब्रीदवाक्य आहे. चव आणि आरोग्य दोन्ही जपण्याचा प्रयत्न आम्ही करतो.

वातावरणनिर्मिती

दमून-भागून आलेल्यांचा मूड ताजातवाना करण्यासाठी खास वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे. हॉटेलची अंतर्गत सजावट कुणाल यांच्या पत्नी राखी मट्टू यांनी केली आहे. बारमध्ये प्रसिद्ध राजकारणी, खेळाडू, अभिनेते यांची व्यंगचित्रे लावण्यात आली आहेत. त्यातून आरोग्याविषयक जागरूकता निर्माण करणारे संदेश देण्यात आले आहेत. लाइव्ह म्युझिकची सोयही आहे. ज्युक बॉक्समधून आवडते गाणे प्ले करता येते. मोफत वाय-फायही देण्यात आले आहे. बारमध्ये सेल्फी कॉर्नरही आहे. विविध झाडांच्या कुंडय़ा ठेवण्यात आल्यामुळे वातावण प्रसन्न असते.

केलची पाने

येथील सॅलड्समध्ये केल या भाजीचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. या भाजीत मोठय़ा प्रमाणात प्रथिने आणि जीवनसत्त्वे असल्याचे कुणाल सांगतात. या भाजीच्या सेवनामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहते, असे त्यांचे म्हणणे आहे. केलची पाने ते दादर येथील एका विक्रेत्याकडून आणतात. आठवडय़ाला २० किलो पाने वापरली जातात.

सॅलड बार

  • कुठे- हावरे इन्फोटेक पार्क, एफ-०८/०९, प्लॉट क्र. ३९/३, सेक्टर-३०-ए, वाशी
  • वेळ- सकाळी ११ ते रात्री ११