X

निमित्त : क्रीडा संस्कृतीतील ‘खेळाडू’

उमलत्या वयातच खेळभावना वाढीस लागावी, हा उद्देश ठेवूनच विकास क्रीडा मंडळाचा उदय झाला.

विकास क्रीडा मंडळ, वाशी

नियोजित शहर म्हणून नवी मुंबईची जशी ओळख आहे, तशी सांस्कृतिक कलेचे उपासक म्हणून हे शहर उदयास आले आहे. कला, संस्कृती क्षेत्रे विकास पावली असताना वाशीमध्ये स्थापन झालेल्या क्रीडा विकास मंडळ या संस्थेने क्रीडासंस्कृती रुजवली आणि ती वाढवलीही. या संस्थेच्या प्रवासाविषयी..

नवी मुंबईत नव्या शहरात खेळाचे अधिष्ठान निर्माण करण्यामागे अनेक संस्था उभ्या राहिल्या त्यात वाशीतील विकास क्रीडा मंडळाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

उमलत्या वयातच खेळभावना वाढीस लागावी, हा उद्देश ठेवूनच विकास क्रीडा मंडळाचा उदय झाला. १९८२ साली वाशी सेक्टर-१६ मधील गंगा टॉवरजवळ १० बाय १० जागेत मंडळाचा कारभार सुरू झाला. रमाकांत शिरवाडकर, भाऊ  सावंत, वसंत अहिरे, दत्ताराम चेऊलकर, सुधाकर गिरव या बिनीच्या कार्यकर्त्यांनी हौशी आणि या क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या एकत्र घेऊन मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे प्रेमनाथ पाटील यांनी मंडळाची वेगळी ओळख निर्माण करून दिली. खेळ आणि आरोग्याची मंडळाकडून सांगड घालण्यात आली. सिडकोने शहराला सांस्कृतिक वारसा व कलेचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी समाजसेवा विभागाची निर्मिती केली त्याद्वारे, खेळ, कला, साहित्य, वाचन, नाटय़, यांच्या विकासासाठी हौशी नागरिकांनी एकत्र येऊन शहराच्या क्रीडात्मक विकासासाठी ज्या संस्था निर्माण झाल्या त्यात वाशीतील सेक्टर १५ येथे असलेल्या ३७० सामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबाजवळ सिडकोने सिडको अधिकारी राम महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ४८० चौरस मीटर जागा देण्यात आली. सुरुवातीला मंडळाची सदस्य वर्गणी ५ आणि १० रुपये तर आजीव सभासद फी ११० रुपये होती. संस्थेचे १२० आजीव सभासद आहेत. आर्थिक दुर्बल घटकांसाठी सिडकोने व्यायामशाळा देण्याचे निश्चित केले होते.गेली ३६ वर्षे संस्था विविध खेळाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्तीसाठी विविध सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. विकास क्रीडा मंडळामुळे तरुण या ठिकाणी एकत्र येऊन शारीरिक कसरती करू लागले.

विकास क्रीडा मंडळाच्यावतीने सुरुवातीला नियमितपणे कबड्डी, शरीरसौष्ठव तसेच महिलांसाठी पाककला आणि रांगोळी स्पर्धाचे आयोजन करून वाशी उपनगरात खेळाविषयी व मंडळाविषयी चांगली प्रतिमा निर्माण करण्याचे काम मंडळाने केले.

माजी आमदार जनार्दन गौरी यांच्या फंडातून पहिली व्यायामशाळा येथे निर्माण झाली. समाजाच्या भावना खेळाशी जोडल्या जातात हाच धागा पकडून विविध खेळांना प्रोत्साहन देण्याचे काम मंडळ गेली ३६ वर्षे अविरतपणे करत आहेत. मंडळामध्ये विविध उपक्रम राबविले जातात. मंडळाच्या महिला समिती व सांस्कृतिक विभागामार्फत वाशी या मध्यवर्ती उपनगरात मराठी संस्कृतीचा ठेवा असलेला पाडवा सण आनंदाने साजरा केला जातो. तसेच नवी मुंबई ड्रामा सर्कल संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना नाटकाचे आणि अभिनयाचे प्रशिक्षणही देण्यात येते. विविध नाटकांची निर्मितीही केली जाते.

तरुणांसाठी स्वस्त दरात व्यायामशाळा उपलब्ध असून विशेष म्हणजे महिलांसाठीही सवलतीत व्यायामशाळा महिलांच्या आरोग्याला महत्त्व देत महिलांना प्रोत्साहित करीत आहे. याच मंडळाच्या ठिकाणी कार्यक्रम होतील असे व्यासपीठ व सभागृह आहे. त्या ठिकाणी विभागातील मध्यमवर्गीय कुटुंबातील नागरिकांचे छोटेखानी उपक्रम अल्पभाडेदरात उपलब्ध करून दिले जाते. विकास क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी, उपाध्यक्ष गोपीनाथ यादव, प्रमुख कार्यवाहक नीतेश पाटील, सहकार्यवाह विवेक भगत, खजिनदार मनोज सोनावणे सध्या कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी असून मंडळाद्वारे अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

नाटय़निर्मिती आणि यश

विकास क्रीडा मंडळामध्ये नवी मुंबई ड्रामा सर्कल संस्थेद्वारे विविध नाटकांची निर्मिती केली जाते. त्यातून संस्थेतील व क्रीडा मंडळाशी जोडलेल्या अनेक संस्था व कलाकारांना संधी दिली जाते. क्रीडा मंडळाद्वारे, संस्थेद्वारे विविध मराठी, हिंदी, संगीत नाटकांची निर्मिती केली असून विकास क्रीडा मंडळाने निर्मिती असलेल्या विवेक भगत प्रस्तुत नाटकाला ५७व्या महाराष्ट्र राज्य  हिंदी नाटय़ स्पर्धेत ‘दूसरा आदमी दूसरी औरत’ नाटकाला सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सवरेत्कृष्ट प्रकाशव्यवस्था व  चौथे सर्वोत्कृष्ट नाटक अशी पारितोषिके प्राप्त झाली आहेत़़