|| शेखर हंप्रस
२० वर्षे न वापरल्याने सिडकोकडून परत करण्याची मागणी
नवी मुंबई : राज्य परिवहन महामंडळाला नवी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी सिडकोकडून मिळालेले भूखंड गमावण्याची वेळ येणार आहे. गेली २० वर्षे हे दोन भूखंड पडून आहेत. बस स्थानक व कार्यशाळा उभारण्यासाठी हे भूखंड दिले होते, मात्र ते वापराविना पडून असल्याने सिडकोने ते परत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केल आहेत. राज्य परिवहन महामंडळाला याबाबत सिडकोने विचारणा केली आहे.
शहरात एसटी स्थानक नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. महामार्गावरील टपरीवजा काही मोजक्यात थांब्यांवर सुविधा नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. महामार्गावर तासनतास थांबून प्रवासी एसटीची वाट पाहत असतात, मात्र या ठिकाणीही खासगी वाहनांमुळे त्यांची मोठी गैरसोय होत असते. गेली अनेक वर्षे नवी मुंबईत ही परिस्थिती असताना बस स्थानकासाठी जागाही उपलब्ध असताना राज्य परिवहन महामंडाळाने मात्र ती जागावापरात आणण्याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे सिडकोने आता हे भूखंड परत घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
सिडकोने १९८९ मध्ये राज्य परिवहन विभागास तुर्भे सेक्टर २० येथे १६ हजार ६६२ चौरस मीटर तर सेक्टर २६ येथे १५ हजार ५३ चौरस मीटरचे दोन भूखंड दिले आहेत. सेक्टर २० येथील भूखंडावर तात्पुरते निवारा शेड उभारले होते, मात्र तेही वापराविना पडून आहे. या ठिकाणी कोणत्याच पायाभूत सुविधा करण्यात आल्या नाहीत.
अभियांत्रिकी महाविद्यालय आणि बस स्थानकाचा प्रस्ताव आहे, मात्र अद्याप तो कागदावरच आहे. सदर भूखंड वीस वर्षांपेक्षा अधिक काळ पडून आहेत. निधीची कमतरता असल्याचे कारण यासाठी दिले जात आहे. मात्र नवी मुंबईत होत असलेल्या प्रवाशांच्या गैरसोयीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सिडकोने हे भूखंड परत मागितले आहेत. त्यामुळे नवी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी असलेले भूखंड राज्य परिवहन मंडळाला गमावण्याची वेळ येणार आहे. या संदर्भात सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.
महाविद्यालय ना एसटी स्थानक
नवी मुंबई पंधरा अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. यात राज्य परिवहन विभागाने या भूखंडावर त्यांचे महाविद्यालय उभारले असते आणखी एक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली असती, मात्र राज्य परिवहनने ना महाविद्यालयाची उभारणी केली ना एसटी स्थानक उभारून प्रवाशांची गैरसोय दूर केली.
नवी मुंबईत प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सिडकोने दिलेल्या भूखंडावर लवकरच बस स्थानक उभे करण्याचे प्रस्तावित आहे. सिडकोला तशी विनंतीही करण्यात आली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रस्ताव तांत्रिक कारणास्तव मागे पडला असून याबाबतही विचाराधीन आहे. – शेखर चन्ने, महाव्यवस्थापक, राज्य परिवहन महामंडळ
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2020 12:12 am