गेली चार महिने न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली चिक्की वाटपावर पालिकेने तात्पुरता तोडगा काढला आहे. कायदेशीर सल्ला घेत तीन महिन्यांसाठी चिक्कीच्या जुन्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आणखी काही दिवसतर विद्यार्थ्यांना चिक्की खावी लागणार आहे.

नवी मुंबई महापालिका विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहार म्हणून चिक्की देत होती. मात्र यावर विरोधकांनी आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे न्यायालयानेही तात्पुरते चिक्की वाटपाला स्थगिती दिली होती. तत्कालीन आयुक्तांनी न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत कोणताही दुसरा पर्याय उपलब्ध करता येणार नाही असा निर्णय घेतला होता. गेली चार महिने हे प्रकरण न्यायालयात असल्याने पालिका शाळेतील विद्यार्थी या पूरक आहारापासून वंचित होते.

मात्र यामुळे विद्यार्थी या आहारापासून वंचित राहात असल्याने पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करीत कायदेशीर सल्ला घेतला. त्यानुसार हा चिक्की वाटपाचा सुमारे २ कोटी ९४ लाख ९८ हजार ४६६ रुपयांचा मुदतवाढ प्रस्ताव स्थायी समितीत घेण्यात आला. याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आता पुढील तीन महिने विद्यार्थ्यांना चिक्की वाटप करण्यात येणार आहे.

न्यायालयाने नवीन निविदा काढण्याला मनाई आदेश दिले आहेत.  कायदेशीर सल्ला घेत डिसेंबपर्यंत चिक्की देण्याला मंजुरी दिली आहे. तोपर्यंत इतर कोणता पूरक पोषण आहार देता का? याचाही निर्णय घेण्यात येईल, असे पालिका आयुक्तांनी सांगितले.