विकास महाडिक

नवी मुंबई मेट्रो आता चार मुहूर्तानंतर पाचव्या मुहूर्तावर म्हणजेच पुढच्या वर्षी सुरू होणार हे दृष्टिक्षेपात येत आहे. या भागातील हजारो नागरिकांचे या वाहतूक व्यवस्थेवर लक्ष आहे. त्यामुळे हा रखडलेला प्रकल्प आता लवकरात लवकर सुरू व्हावा अशी नवी मुंबईकरांची अपेक्षा आहे.

देशात ऑक्टोबर १९८४ मध्ये कोलकाता येथे पहिली मेट्रो सुरू झाली. त्यानंतर दिल्ली मेट्रोने कात टाकली. देशातील पहिली आधुनिक मेट्रो २००२ मध्ये दिल्लीत धावली. या दिल्लीच्या जवळच गुडगावमध्ये खासगी मेट्रो धावत आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बंगळूरु, जयपूर, हैदराबाद, मुंबई येथे मेट्रोचे जाळे विणले गेले आहे. सहा वर्षांपूर्वी मुंबई मेट्रो सुरू झाली आहे. वाहतुकीचे किफायतशीर साधन म्हणून मेट्रोकडे पाहिले जाते. त्यामुळे प्रत्येक महानगर मेट्रोला प्राधान्य देत आहे. देशातील बडय़ा महानगरांनी वाहतूक कोंडी व वाढते वाहन प्रदूषण यावर उपाय म्हणून मेट्रोकडे पाहिले आहे. मात्र नवी मुंबईत सिडकोने आगामी दळणवळणाचे साधन म्हणून मे २०११ मध्ये नवी मुंबई मेट्रोची मुहूर्तमेढ रोवली आहे. काँगेस, राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दहा वर्षांपूर्वी या सेवेचा शुभारंभ केला. त्यावेळी सिडकोने दिलेल्या माहितीनुसार चार वर्षांत नवी मुंबई मेट्रो सुरू होणार असे जाहीर करण्यात आले. विमानतळाच्या उड्डाणापूर्वी मेट्रो धडधडणार म्हणून घरांचे स्वप्न पाहिलेल्या हजारो नोकरदारांनी मेट्रो धावणाऱ्या भागात घर घेण्यास प्राधान्य दिले. काहींनी मुंबईतील घरे विकली तर काहींनी गुंतवणूक म्हणून या भागाकडे पाहिले. सिडकोने बेलापूर ते पेंदार हा ११ किलोमीटर लांबीचा मार्ग पहिल्यांदा उभारण्यास सुरुवात केली. त्यामुळे खारघर, कळंबोली, तळोजा, कामोठे, नवीन पनवेल, या भागातून नोकरदार मेट्रोने बेलापूरला येणार आणि तेथून मुंबईत जाणार असे आराखडे बांधू लागले. चार वर्षांत मेट्रो येणार या आवईचा विकासकांनी फायदा घेतला नाही तर नवलच. छोटय़ा-मोठय़ा घरांचे दर दोनशे ते चारशे प्रति चौरस फुटाने वाढले. त्यामुळे विकासकांची चंगळ झाली. विमानतळ आणि मेट्रो हे सिडकोने विकासकांनी जाहिरातीसाठी दिलेले फार मोठे वरदान ठरलेले आहे. दुर्दैवाने हे दोन्ही प्रकल्प आजूनही अस्तित्वात नाहीत. विमानतळ आर्थिक आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवरून गेली दहा वर्षे गटांगळ्या खात आहे. या प्रकल्पाच्याही आतापर्यंत चार ते पाच तारखा केंद्र व राज्य नेतृत्वाने जाहीर केलेल्या आहेत. या प्रकल्पाचा आता कंत्राटदारच बदलल्याने येत्या दोन ते तीन वर्षांत हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा प्रकल्प सर्वसामान्यांच्या दळवळणाच्या दृष्टीने फारसा महत्त्वाचा नाही. त्यामुळे त्याला आणखी चार ते पाच वर्षे लागली तरी सर्वसामान्यांच्या जीवनात फारसा फरक पडत नाही, मात्र मेट्रोकडे सर्वसामान्य नागरिकांचे डोळे लागून राहिलेले आहेत. पहिल्या चार वर्षांत या प्रकल्पाची जी महत्त्वाची कामे झाली पाहिजे होती तीच न झाल्याने हा प्रकल्प चार वर्षांत सुरू होण्याच्या आशा मावळल्या. त्यानंतर आणखी दोन वर्षांची मुदत सरकारने जाहीर केली. मात्र नवी मुंबई मेट्रोला अनेक विघ्ने आली. या प्रकल्पाचे काम करणारा कंत्राटदार व सिडकोत मतभेद झाले. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम उशिरा होऊ लागल्याचा सिडकोने आरोप केला. काम रद्द करण्यावरून प्रकरण न्यायालयात गेले. त्यात दोन वर्षे गेल्यानंतर सिडकोने नवीन कंत्राटदार नेमले. आता काम कुठे रुळावर आले आहे. त्याच वेळी भारत-चीन सीमावाद सुरू झाला आहे. या सीमावादाचे पडसाद नवी मुंबई मेट्रोवर पडलेले आहेत. कारण या प्रकल्पासाठी लागणारे डब्बे हे चीनमधून आयात करण्यात आले आहेत. त्यातील काही डब्बे खारघरच्या आगारात झाकून ठेवण्यात आले आहेत. याच डब्ब्यातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो सुरू झाली असा आव आणत झेंडे दाखविले. सप्टेंबर २०१९ मध्ये फडणवीस यांनी सर्व चाचण्या सुरळीत पार पडल्यानंतर चार महिन्यात नवी मुंबई मेट्रो सुरू होणार असे जाहीर केले. चाचणी होऊन आता १७ महिने झाले तरी मेट्रो सुरू होण्याची कोणतीही लक्षणे नाहीत. मेट्रोला आता अर्थपुरवठय़ाची चणचण भासू लागली आहे. प्रकल्प रखडल्याने दोन हजार कोटीचा हा प्रकल्प आता चार हजार कोटीवर गेला आहे. त्यासाठी सिडकोला कर्ज घेण्याची वेळ आली आहे. कमीत कमी दराने एका खासगी वित्तपुरवठा संस्थेकडून कर्ज घेऊन हा प्रकल्प आता पुढील वर्षी सप्टेंबपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. १ मे २०२२ रोजी हा प्रकल्प लोकार्पण करण्याचे प्रयत्न आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सर्व प्रकल्प कार्यान्वित आणि पूर्ण करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या काही व्यवस्थापकीय संचालकांनी विमानतळ अथवा महागृहनिर्मितीवर जास्त लक्ष दिले होते. मुखर्जी यांनी सर्वच रखडलेल्या प्रकल्पांना हात घातला आहे. त्यामुळे नवी मुंबई मेट्रो आता चार मुहूर्तानंतर पाचव्या मुहूर्तावर म्हणजेच पुढच्या वर्षी सुरू होणार हे दृष्टिक्षेपात येत आहे. या भागातील हजारो नागरिकांचे या वाहतूक व्यवस्थेवर लक्ष आहे. त्यामुळे हा रखडलेला प्रकल्प आता लवकरात लवकर सुरू व्हावा, अशी नवी मुंबईकरांची अपेक्षा आहे.