नवी मुंबई महानगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत ६ कोटींच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात औषध खरेदी, तुभ्रे व कोपरखरणे विभागातील सी टेक अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बांधण्यात आलेल्या मलप्रक्रिया केंद्र चालविणे व देखभाल दुरुस्ती. घणसोलीमधील राबाडा शारकर आळी येथील जुने बैठी शौचालय तोडून सार्वजनिक शौचालय बांधण्याच्या विकास कामांना सर्वानुमते मंजुरी मिळाली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या औषध खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आला असता स्थायी समिती सभापती शिवराम पाटील यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हिरानंदानी रुग्णालयात ८०० रुग्ण उपचार घेतात. या रुग्णालयामध्ये वशिलेगिरी सुरू आहे. त्यामुळे त्यांचे कंत्राट वाढविण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती शिवराम पाटील यांनी प्रशासनाला दिले. या समितीमध्ये महापौर व आयुक्तांच्या आदेशाखाली स्थापन करून विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते, गट नेते, पक्षप्रतोद यांना घेण्यात यावे. अशी समिती स्थापन करण्याचे प्रशासनाला आदेश दिले.  स्थायी समितीच्या सभेत नगरसेवक शुभांगी पाटील यांनी तुभ्रे येथील भाजी मार्केटमध्ये पाणी येत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. तर नगरसेवक प्रशांत पाटील यांनी घणसोलीमधील स्मिप्लेंक्स कॉलनीमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याचे सांगितले. नगरसेविका मीरा पाटील यांनी एक वर्षांपूर्वी नेरुळमध्ये पाणी येत होते. परंतु आता पाणी येत नसल्याची खंत व्यक्त केली. या वेळी पालिका शहर अभियंता मोहन डंगावकर यांनी शहरातील पाण्याची समस्या असलेल्या ठिकाणी पाहणी करून सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल असे स्पष्ट केले. तसेच नगरसेवक एम. के. मढवी, नगरसेविका भारती कोळी, नगरसेवक अशोक गुरखे यांनी शहरातील आरोग्य विषयावर लक्ष वेधत प्रशासनाला धारेवर धरले.