‘हेल्पलाइन ११२’ लवकरच सेवेत; नवी मुंबईतील कॉल सेंटरची गृहमंत्र्यांकडून पाहणी

नवी मुंबई</strong> : आपत्कालीन परिस्थितीत मदत म्हणून राज्य सरकार आता ‘हेल्पलाइन ११२’  ही सेवा सुरू करीत आहे. महिला अत्याचार, रस्ते अपघात असो वा आग लागल्याच्या घटनांत यावर क्रमांकावर संपर्क केल्यास फक्त पाच मिनिटांत मदत मिळणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यासाठीच्या या प्रकल्पाचा संपर्क कक्ष (कॉल सेंटर) नवी मुंबईतील महापे परिसरात होत आहे. याच्या पाहणीसाठी गृहमंत्री बुधवारी नवी मुंबईत आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना या सेवेबाबत माहिती दिली.

रस्ते अपघातात वर्षांत लाखो लोक मरण पावतात. त्यातील ९० टक्के लोकांना वेळेवर वैद्यकीय सेवा न मिळाल्याने मृत्युमुखी पडतात. महिलांवर होणारे अत्याचार, आग लागणे, अन्य आपत्कालीन परिस्थिती, संशयास्पद व्यक्ती वा वस्तू दिसणे, रुग्णवाहिकेची गरज याच्या मदतीसाठी ११२ हेल्पलाइन क्रमांक ठेवला आहे. या प्रकल्पासाठी नवी मुंबईत पाच मजली कॉल सेंटरमहापे मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये उभे राहत आहे.

या कामाची पाहणी त्यांनी बुधवारी केली. लवकरात लवकर ही सेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे या वेळी अनिल देशमुख यांनी सांगितले. या वेळी नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, सह आयुक्त जय जाधव यांच्या सह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.