जुईनगर ते नेरूळ दरम्यान भारतरत्न राजीव गांधी उड्डाणपुलाखालून लोकल जात असताना अज्ञाताने केलेल्या दगडफेकीत शनिवारी एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली आहे. फातिमा गांधी (३५, रा. नेरुळ सेक्टर २०) असे जखमी महिलेचे नाव असून, तिच्यावर तेरणा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शनिवारी संध्याकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. सीएसएमटी स्थानकातून निघालेल्या लोकलमधून फातिमा प्रवास करीत होत्या. लोकल जुईनगर स्थानकातून निघाल्यानंतर त्या लोकलच्या दरवाज्याजवळ उभ्या राहिल्या. लोकल राजीव गांधी उड्डाणपुलाखाली गाडी आली असताना अचानक अज्ञात व्यक्तीने भिरकवलेला दगड त्यांच्या नाकावर येऊन आढळला. आसपासच्या महिला प्रवाशांनी त्यांना सावरत बाकडय़ावर बसवले मात्र रक्तस्त्राव थांबत नसल्याने नेरुळ स्थानकात उतरताच त्यांनी नजिकचे तेरणा रुग्णालय गाठले.

या बाबत वर्षां बास यांनी वाशी रेल्वे पोलिसांना माहिती देताच हवालदार अनिल कलाल यांनी तेरणा रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती कलाल यांनी दिली.