श्रीवर्धन, मुरुड तालुक्यांतील सीमेंटच्या पत्र्यांचा साठा काही तासांत विकला गेल्याने तुटवडा

नवी मुंबई : रायगड जिल्ह्य़ातील माणगाव, श्रीवर्धन आणि मुरुड या तालुक्यांना ‘निसर्ग’ वादळाचा मोठा तडाखा बसला. त्यात घरांवरील सीमेंटच्या छपरांचे नुकसान झाले. त्यानंतर सीमेंटच्या पत्र्यांची खरेदी करण्यासाठी शहरांतील दुकानांकडे नागरिकांनी धाव घेतली आणि काही कालावधीतच पत्र्यांची विक्री झाली. त्यानंतर आता पत्र्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे.

आता काही ग्रामस्थांनी सीमेंटच्या पत्र्यांसाठी पनवेल, नवी मुंबई भागातील घाऊक व्यापाऱ्यांकडे विचारणा सुरू केली आहे.

श्रीवर्धन आणि मुरुड या दोन तालुक्यांना चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे  घरांवरील सीमेंटचे पत्रे उडून गेले.

माणगाव बाजारपेठेतील अनेक इमारतीवरील सिमेंटचे छप्पर उडाले. नवीन घरे किंवा जुन्या घरांची कौले काढून त्या ठिकाणी टाकण्यात येणारे सीमेंटचे छप्पर हे तालुक्याच्या ठिकाणी खरेदी केले जात असल्याचे माणगाव येथील रहिवाशी उमेश देशमुख यांनी सांगितले. इथे सीमेंट, वाळू, छप्पर आणि इतर बांधकाम साहित्य विकणाऱ्या विक्रेत्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर असलेल्या सीमेंट छप्पर विक्रेत्यांकडे असलेला छपरांचा साठा दुसऱ्या दिवशी काही तासातच संपला, असेही देशमुख म्हणाले. पावसाळ्यात छपराविना घरात अशक्य आहे. काही गावांत  वादळानंतर घरात पावसाचे पाणी तुंबलेले आहे. त्यात मुंबई, पुण्यात  राहणाऱ्या अनेकांनी गावात घरे बांधली आहेत, पण ते तिथे राहात नाहीत.  त्यांच्या घरावरील सीमेंटचे पत्रे वादळात उडून गेले आहेत. काहींना त्याविषयी कळविण्यात आले आहे. त्यांनी आता त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु, तालुक्याच्या ठिकाणी पत्र्यांची संख्या कमी असल्याने बहुतेक घरे छपराविनाच आहेत. रायगडच्या उपजिल्हाधिकारी डॉ. पदमश्री बैलाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागातील लाखो घरांचे नुकसान झाले आहे.

विक्रेत्यांकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन

वादळग्रस्त नागरिकांनी पनवेल, कळंबोली, खारघर आणि नवी मुंबईतील काही किरकोळ आणि घाऊक विक्रेत्यांकडे सीमेंटच्या छपरांची मागणी केली आहे. रायगडसाठी येत्या काळात लाखो सीमेंट छप्पर लागणार असल्याने महामुंबईतील विक्रेत्यांनीही रायगडवासियांना मदत करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे पनवेल येथील लक्ष्मी ट्रेडर्सच्या पटेल यांना सांगितले.