ज्वेल ऑफ नवी मुंबई पार्क, नेरूळ-पामबीच रोड

शहरीकरणाच्या रेटय़ात मनाला समाधान देणाऱ्या अनेक गोष्टी दिवसेंदिवस शहरातून गायब होत असताना मोकळी मैदाने आणि तलाव यांचाही प्रवास त्याच दिशेने सुरू आहे. डोंगररांगा आणि विस्तीर्ण खाडी नवी मुंबईला लाभली आहे. निवांतपणाचा आस्वाद घेण्यासाठी वृक्ष आणि सभोवार पाणी असेल तर काय मौज येईल.. नवी मुंबईत पामबीच येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई पार्कमध्ये ही कल्पना प्रत्यक्षात येते. नवी मुंबईतील एकाग्रतेचे ठिकाण अशी याची ख्याती आहे..

नवी मुंबईचा कंठहार म्हणून नावारूपास आलेल्या पामबीच रोडच्या मागील बाजूस पालिकेचे ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई पार्क’ साकारण्यात आले आहे. खाडीलगत चार किलोमीटर परिसरात ‘जॉगिंग ट्रॅक’ आणि मध्यभागी विस्तार्ण तलाव अशी ज्वेलची रचना आहे. वनराईसोबत कांदळवन असा निसर्गाचा दुहेरी मिलाफ येथे झाला आहे. ‘जॉगिंग ट्रॅक’वर उत्तम प्रतीच्या लाद्या बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे धीम्या-जलद गतीने धावणाऱ्यांना कोणताही अडथळा येत नाही. ‘ज्वेल पार्क’मध्ये ‘द थिंकर’ पूर्णाकृती पुतळा आहे. पामबीच मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचे हा पुतळा लक्ष वेधून घेतो. ‘ज्वेल पार्क’वर चार किलोमीटर परिसरात विविध प्रकारची फुलझाडे आहेत. त्यामुळे विचार, मनन वा चिंतन करण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला सुमनांचा सहवास आणि सुगंधही मिळतो. नवी मुंबईकरांसाठी हे ठिकाण मोठे जिव्हाळ्याचे आहे.

पहाटे पाच वाजता ‘ज्वेल पार्क’ उघडते. सीवूड, बेलापूर आणि नेरुळ परिसरातून नागरिक येथे चालण्यासाठी येतात. दुपारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे येथे गटाने येतात. गटचर्चा आणि वर्गातील अभ्यासाचे काही विषय येथे चर्चिले जातात. वनराईच्या सोबतीने अनेकांच्या प्रतिभेला बहर आलेला असतो.

पावसाळ्यात पार्कमध्ये झाडे वाढल्याने सकाळी चालण्यासाठी आलेल्या नागरिकांना थोडी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे पूर्ण पार्कचे गोलाकार अंतर पूर्ण न करता बहुतेकांना अर्धवट फेरी घालून घरी परतावे लागत होते. आता हा प्रश्न मिटला आहे. पार्कमध्ये येण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत. चालण्यासाठी येणाऱ्यांच्या वाहनांसाठी वाहनतळ उपलब्ध आहे.

‘जॉगिंग ट्रॅक’च्या मागील बाजूस सीवूड येथून येणाऱ्या नागरिकांच्या प्रवेशद्वारावर विनामूल्य खुली व्यायामशाळा आहे. येथे तरुण तसेच वयस्कांची रोज हजेरी असते.  पार्कमध्ये प्रसाधनगृहाची सोय आहे; मात्र अद्याप ते नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही.

योग हा येथे येणाऱ्यांसाठी पर्वणीच आहे. सकाळी आल्हाददायक वातावरणात अनेकजण योगासने करण्यासाठी काही जागा पकडतात. दोन सुरक्षारक्षक ज्वेल पार्कची देखभाल ठेवतात. स्वत:सोबत श्वानांनाही व्यायाम मिळावा यासाठी काही जण ‘जॉगिंग ट्रॅक’मध्ये येतात. याशिवाय सायकलिंगसाठी काही तरुणांची येथे रोजची हजेरी असते. सकाळी चालणाऱ्यांसाठी किती अंतर कापले हे दाखविण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. तलावात खाडीचे पाणी असल्यामुळे ते खाडीला जाण्यासाठी लाकडी बंधारे बांधण्यात आले आहेत. तलावात ज्यादा पाणी साठल्यास ते खाडीत सोडण्यात येते.

पालिकेने सुंदर ‘जॉगिंग ट्रॅक’ बनवले आहे. काही असुविधा सोडल्या तर पहाटे चालण्यासाठी येथे येणे आनंददायक असते.

– भरत धांडे, नागरिक.

ज्वेल पार्कमध्ये खुली व्यायामशाळा असल्याने त्याचा सर्वानाच फायदा होतो. चालण्यामुळे दिवसाची सुरुवातच आरोग्यदायी होते. येथील अनेकांशी झालेली ओळख हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे.

विवेक अंभोरे, नागरिक.