जुहूगाव

चोहोबाजूंनी पाण्याने वेढलेले एक छोटे बेट म्हणजे आजचे वाशी नोडजवळील जुहूगाव. मंगलुरी कौले व केमजईच्या झाडांच्या फांद्यापासून बनविलेली मोजून ४३ घरे. कष्टकरी आगरी समाजाचे हे गाव. आज हे गाव वाशी सेक्टर नऊ, दहा, पंधरा, सोळा, बारा आणि २९ पर्यंत विस्तारले आहे. पूर्वी गावाच्या पूर्वेस असलेल्या कांगा उसरजी डोमभाई या पारशी व्यापाऱ्याच्या मिठागरावर अख्खे गाव कामासाठी जात असे. आताच्या एपीएमसी मार्केटच्या जागेवर कांगा शेठची अर्धी मिठागरे होती.

Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
uran marathi news, uran farmers marathi news, mangroves uran marathi news
उरणच्या शेती, मिठागरांत समुद्राचे पाणी; खारफुटीमुळे शेतकऱ्यांवर जमिनींचा मालकी हक्क गमावण्याची वेळ
sangli wild animal attack marathi news
सांगली : हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात २४ मेंढ्या ठार, ७ गायब

सत्तरच्या दशकात सिडकोने या क्षेत्रात विकासाचे पर्व सुरू केल्यानंतर १९८१ मध्ये जमिनी देण्यास सिडकोला विरोध करणारे हे नवी मुंबईतील हे पहिले गाव. माजी दिवगंत खासदार दि. बा. पाटील व कामगार नेते तुकाराम भाई वाजेकर यांनी या गावाचे त्या वेळी नेतृत्व केले. त्यामुळेच एक लढाऊ परंपरा या गावाला लाभली आहे. सरकार दरबारी वाशी जुहूगाव अशी नावाची पाटी कायम राहावी यासाठी प्रारंभी प्रयत्न करणाऱ्या या गावातील तरुणांच्या संघर्षांला यश न आल्याने आज वाशीच्या कुशीत हे गाव हरवून गेले आहे. ग्रामस्थांच्या दृष्टीने समाधानाची एकच बाब- सिडकोने वाशी सेक्टर नऊ व दहामध्ये बांधलेल्या मध्यमवर्गीयांच्या गृहसंकुलाला जेएन-वन, जेएन-टू अशी नावे दिली आहेत. त्यातील ‘जे’ म्हणजेच जुहूगाव.

नवी मुंबईतील सिडकोच्या धोकादायक इमारतींतील रहिवाशांना वाढीव अडीच एफएसआय मिळावा यासाठी संघर्ष करणाऱ्या याच भागातील रहिवाशांनी आपली लढाऊ वृती कायम ठेवून संपूर्ण शहराला वाढीव एफएसआय मिळवून दिला. या लोकवस्तीचा उल्लेख सर्वत्र वाशी असाच केला जात आहे. आज येथील गावपण लोप पावले आहे. बेकायदा बांधकामांचे बेट म्हणून कुप्रसिद्ध झाले आहे. नियम धाब्यावर बसवून मोठय़ा संख्येने राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांचा त्रास ग्रामस्थांना होऊ लागला आहे. ग्रामस्थांनी लढण्यास नकार दिल्याचे चित्र आहे.

चारही बाजूंनी खारे पाणी असलेल्या या बेटावर ६० वर्षांपूर्वी पिण्याचे पाणीही मिळत नव्हते. ग्रामस्थ बोनकोडे येथील फकीर गणा भोईर यांच्या विहिरीवरून पाणी भरत. त्यासाठी पायपीट करावी लागत असे. गावाच्या बाहेर पडण्यासाठी केवळ एकच रस्ता होता. तो १९६५च्या सुमारास नारायण फकीर नाईक यांच्या पुढाकाराने श्रमदानातून बनविण्यात आला होता. इतर ठिकाणी ये-जा करण्यासाठी ओहोटी येण्याची वाट पाहावी लागे. ग्रामस्थांपुढे दुसरा पर्याय नव्हता.

दिवसभर मिठागरांवर काम करायचे आणि संध्याकाळी गावाच्या मरीआई मंदिरात भजन करायचे, असा दिनक्रम असे. गावात वारकरी परंपरेचे लोक होते, पण दारूच्या भट्टय़ा लावणाऱ्यांची कमतरता नव्हती. त्यामुळे आजूबाजूच्या गावांना या गावातून गावठी दारूचा पुरवठा होत असे. या गावात पोलीस पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे दारू बनवण्यासाठी हे बेट सुरक्षित मानले जात होते.

गावांपासून खूप दूर असलेल्या या गावात इतर गावांप्रमाणे भजनाशिवाय अन्य लोककला जिवंत राहिल्या नाहीत. ग्रामस्थांचे श्रद्धास्थान म्हणजे मरीआईचे मंदिर. आज ते वाशी आणि जुहूगावची सीमारेषा मानले जाते. या मंदिरात सणासुदीला भजन कानावर पडत असे. शिक्षणाच्या नावाने तशी बोंबच होती. सत्तरच्या दशकात आजही प्रकृतीने ठणठणीत असलेल्या ९८ वर्षीय पांडुरंग पाटील यांच्या जुन्या घरात शासनाने एक चौथीपर्यंतची शाळा सुरू केली. त्यामुळे गावातील काही तरुण शिक्षणाच्या वाटेवर गेले. त्यातील काही जणांनी सरकारी नोकरी केली, तर काही जणांनी खासगी नोकऱ्या पत्करल्या. कोपरखैरणे रेल्वे स्थानकासमोरील जुन्या कॅफी कंपनीत (ज्या ठिकाणी जंजीर चित्रपटाचे चित्रीकरण झाले.) येथील काही तरुण नंतर कामाला लागले. त्यामुळे गावातील काही कुटुंबांची प्रगती झाली. सणासुदीला घणसोलीच्या जुमाखान या व्यापाऱ्याकडे गावातील ग्रामस्थ खरेदीसाठी जात.

सहजासहजी जमीन देण्यास विरोध करणाऱ्या या गावाला नंतर सिडकोने नागरी सुविधांपासून वंचित ठेवल्याचा आरोप केला जात आहे. शौचालय, मैदान, उद्याने यासारख्या साध्या सुविधांचा अभाव, गावठाण विस्ताराकडे दुर्लक्ष आणि नेहमीच दिलेल्या सापत्न वागणुकीमुळे या गावाने नंतर आपला अस्ताव्यस्त विस्तार केला. वाशीसारख्या महत्त्वाच्या उपनगराजवळ हे गाव असल्याने येथील जमीन आणि घरांनाही सोन्याचे भाव आले. त्यामुळे या ठिकाणी शहरातील सर्वात जास्त बेकायदा बांधकाम झाले. आज या गावाची ओळख बेकायदा बांधकामांचे बेट अशीच झाली आहे. एकेकाळचे हे लढवय्ये गाव आज बेकायदा घडामोडींबाबत काहीच करत नाही. शासनाने टाकलेल्या पोलिसांच्या छावणीची भीती जणूकाही आजही या गावातील ग्रामस्थांच्या मनात घर करून बसली आहे.

जुईखाडी आणि जुहूगाव

या गावाचे नाव कशावरून पडले याची काही नोंद नाही पण सेक्टर १७ जवळील नाल्यावर बांधण्यात आलेल्या एका जुन्या पुलावर जुईगाव असा उल्लेख आढळतो. जुईखाडीवरून त्या पुलाला नाव देण्यात आले आहे. त्याच खाडीवरून जुईगाव व जुहूगाव अशी दोन गावांची नावे पडली असावीत असा एक तर्क केला जातो.

पोलिसांची छावणी

जानेवारी १९८१ च्या सुमारास शासनाने सिडकोला संपादित करून दिलेल्या जमिनीचा ताबा देण्यास याच गावातील ग्रासस्थांनी सर्वप्रथम विरोध केला. विरोध मोडून काढण्यासाठी त्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यानंतर संपूर्ण शहरातील शेतकऱ्यांचा उठाव मोडीत काढण्यासाठी केंद्र सरकाने पाठविलेल्या केंद्रीय पोलीस दलाची छावणी याच गावााच्या वेशीवर होती. जमीन संपादनावरून त्या वेळी काही गावांत संघर्षांच्या मशाली पेटल्या. त्यामुळे हंगामी सीआयएसएफ जवानांची वसाहतच या गावच्या दक्षिणेकडे वसवण्यात आली. चोवीस तास पहारा ठेवून गावकऱ्यांची लढावू वृती चिरडण्यात आली.

आवाहन

सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातील घडामोडींवर तुमची नजर असेलच; रस्ते, वीज-पाणीपुरवठा, रस्त्यांवरील खड्डे आणि स्वच्छता अशा अनेक मुद्दय़ांवर तुम्हाला लिहावेसे वाटत असेल तर तुमच्या ‘लोकसत्ता महामुंबई’साठी पत्र लिहा..आमचा ई-मेल mahamumbainews@gmail.com