वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात स्ट्रॉबेरी स्वस्त तर अंजीर महाग झाले आहेत. फळ बाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढल्यामुळे स्ट्रॉबेरी प्रतिकिलो ४०रुपयांनी स्वस्त झाली आहे, तर अंजिराला पावसाचा फटका बसल्यामुळे त्याच्या किमतीत ३० रुपयांची वाढ झाली आहे.

दरवर्षी डिसेंबरमध्ये सुरू होणारा स्ट्रॉबेरीचा हंगाम यंदा ओखी वादळामुळे आलेल्या पावसामुळे लांबणीवर पडला. जानेवारीत स्ट्रॉबेरीला बहर आला आहे. गेल्या महिन्यात एक हजार क्रेटपर्यंत असलेली स्ट्रॉबेरीची आवक आता ३ हजार ५०० क्रेटपर्यंत पोहोचली आहे. जादा आवक झाल्याने स्ट्रॉबेरी किलोमागे ४० रुपयांनी स्वस्त झाली आहे. डिसेंबर महिन्यात प्रतिकिलो २४० ते ४०० रुपयांना उपलब्ध असलेली स्ट्रॉबेरी आता प्रतिकिलो २०० ते   ३६० रुपयांवर आली आहे. यामध्ये महाबळेश्वर, पाचगणी, भिलार येथून आलेल्या कामारोजा, विंटर, स्वीट चार्ली अशा विविध प्रकारच्या स्ट्रॉबेरीचा समावेश आहे. कामारोजा प्रकारातील स्ट्रॉबेरी अधिक प्रमाणात आली आहे.

अंजीर उत्पादन घटले

* नोव्हेंबर ते मेपर्यंत अंजिराचा हंगाम सुरू असतो, मात्र अधिक कडाक्याच्या थंडीत अंजिराची वाढ खुंटते. त्यामुळे आवक कमी झाली असल्याचे मत फळ व्यापारी व्यक्त करत आहेत. फळ बाजरात २०० ते २५० क्रेट एवढय़ा प्रमाणात येणाऱ्या अंजिराची आवक १५० क्रेटपर्यंत कमी झाली आहे.

* आवक कमी झाल्याने ७० ते १२० रुपये बाजारभाव असलेले अंजीर १०० ते १५० रुपयांवर गेले आहेत. तसेच अंजिराचा पहिला बहर संपला असून महिनाभराने दुसरा बहर सुरू होणार आहे. या दरम्यान अंजिराचे भाव चढेच राहणार असल्याचे मत पीक उत्पादक संजय काळे यांनी व्यक्त केले आहे.