एपीएमसी बाजारात आवक वाढली; दीड हजार पेटय़ा दाखल

वाशीच्या मुंबई कृषीउत्पन्न फळबाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. ओखी वादळ आणि अवकाळी पावसाने पिकाला करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. स्ट्रॉबेरी पिकाची त्यावर मात करून उभारी आलेली आहे. जानेवारी महिन्यात अधिक आवक वाढेल, असे मत फळ व्यापारी व्यक्त करीत आहेत.

एपीएमसी बाजारात नोव्हेंबरमध्ये स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात होते. डिसेंबर महिन्यात या पिकाचा हंगाम सुरू होतो. डिसेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाने उत्पादन कमी झाले होते. डिसेंबर महिन्यात स्ट्रॉबेरीच्या ३०० ते ४०० पेटय़ा दाखल झाल्या होत्या, ही आवक वाढून बाजारात आता हजार ते दीड हजार पेटय़ा स्ट्रॉबेरी दाखल होत आहेत. स्ट्रॉबेरीला बहर डिसेंबर महिन्यात येतो. मात्र आता पिकाला साजेसे थंडीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे चांगले उत्पादन तयार होण्यास सुरुवात झालेली आहे. महाबळेश्वर, पाचगणी येथून येणाऱ्या स्ट्रॉबेरी जानेवारी महिन्यात अधिक प्रमाणात दाखल होईल असे मत फळ व्यापारी संजय पिंपळे यांनी व्यक्त केले आहे. सरत्या वर्षांला निरोप देण्याकरिता या भागात अधिक पर्यटक दाखल होत असतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर स्ट्रॉबेरीची अधिक विक्री होत आहे. नवीन वर्षांत आठडय़ाभरात एपीएमसीमध्ये अधिक प्रमाणात स्ट्रॉबेरीची नोंद होईल. प्रतिकिलो १६० रुपयांवर असणारी स्ट्रॉबेरी आता २४० रुपयांवर विक्री होत आहे.

अवकाळी पावसामुळे थोडे नुकसान झाले होते. परंतु आता स्ट्रॉबेरीचे चांगले पीक येत आहे. सध्या महाबळेश्वर, पाचगणी या भागात पर्यटन ही अधिक असल्यामुळे स्ट्रॉबेरीच्या मागणीत वाढ झाली आहे.

अनिल बावळेकर, स्ट्रॉबेरी उत्पादक