गतवर्षीच्या तुलनेत निम्मी आवक

दरवर्षी नोव्हेंबरच्या आरंभीच सुरू होणारा स्ट्रॉबेरीचा हंगाम यंदा लांबलेल्या पावसामुळे उशिरा सुरू होणार आहे. अर्धा नोव्हेंबर उलटल्यानंतरही स्ट्रॉबेरीची आवक कमीच आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये ५०० क्रेट स्ट्रॉबेरी बाजारात आली होती, यंदा अवघे २०० ते २५० क्रेट स्ट्रॉबेरीची आवक झाली आहे.

स्ट्रॉबेरी हे हिवाळ्यात पिकणारे फळ असल्याने त्याची आवक डिसेंबर आणि जानेवारीत मोठय़ा प्रमाणात होत असली, तरीही नोव्हेंबरपासूनच स्ट्रॉबेरी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये ५०० क्रेट आवक झाली होती यंदा तेच प्रमाण २०० ते २५० क्रेटवर आले आहे. पाऊस लांबल्यामुळे उत्पादन कमी झाल्याचे मत फळ व्यपाऱ्यांनी सांगितले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये स्ट्रॉबेरीच किंमत प्रति किलो ६० ते  १२० रुपये होती. यंदा ती ८० ते १८० रुपयांवर पोहचली आहे. डिसेंबरमध्ये किती आवक होते, यावर अवकाळी पावसाचा किती फटका बसला, हे ठरणार आहे.

पाऊस लांबल्याने स्ट्रॉबेरीचा दर्जा थोडा खालावला आहे. शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे, असे भिलार येथील स्ट्रॉबेरी उत्पादक तानाजी भिलारे यांनी सांगितले.