लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : टाळेबंदी शिथिलीकरणानंतर भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढल्याच्या तक्रारी पोलीस व पालिका प्रशासनाकडे येत आहेत. कचराकुंडीमुक्त शहर झाल्याने सहज उघडय़ावर मिळणारे अन्न मिळेनासे झाल्याने या कुत्र्यांनी आता गृहसंकुलांच्या परिसरात मुक्काम हलविल्याचे दिसत आहे. येथील काही प्राणीप्रेमींच्या अन्नदानामुळे त्याची भूक भागत आहे, तर रात्रीचे भुंकणे असह्य़ झाल्याने रहिवाशांची झोपमोड होत आहे.

यातूनच पनवेल येथील एका गृहनिर्माणसंस्थेत झालेल्या मारहाणीत एका कुत्र्याचा मृत्यू तर तीन ते चार कुत्री जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी एका रहिवाशासह सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कोपरखैरणे येथे एका गृहनिर्माण संस्थेतील पाळीव कुत्र्याने पाच वर्षीय मुलीला जखमी करण्याची घटना घडली असून त्या मुलीच्या आईने कुत्र्याच्या मालकाविरोधात तक्रार केली आहे.

पालिकेने १३ वर्षांपूर्वी केलेल्या पशुगणनेंतर्गत शहरात असलेल्या ३५ हजार ५५५ कुत्र्यांची संख्या निर्बीजीकरण शस्त्रक्रियेमुळे कमी झाली आहे. सप्टेंबर २०१२ मध्ये करण्यात आलेल्या मोजणीत ही संख्या सहा हजाराने कमी होऊन २९ हजारांपर्यंत गेली. गेल्या सात वर्षांत यात आणखी घट होऊन नवी मुंबईत आता २२ हजार भटक्या कुत्र्यांची संख्या असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई पालिकेच्या वतीने तुर्भे येथील क्षेपणभूमीजवळील निर्बीजीकरण केंद्रात यापूर्वी ५०० ते ६०० कुत्र्यांवर दर महिना निर्बीजीकरण केले जात होते, मात्र अलीकडे भटकी कुत्री सहज हाती लागत नसल्याने ही संख्या शे-दीडशेपर्यंत आहे. स्वच्छ भारत अभियानांर्तगत पालिकेने ओला व सुका कचऱ्यांचे वर्गीकरण सक्तीचे केले असून रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या कचराकुं डय़ा हटविल्या आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना सहज मिळणारे अन्न आता मिळेनासे झाले आहे.  मार्च महिन्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीनंतर उपाहारगृह, रेस्टॉरन्टमधील वाया जाणाऱ्या अन्नावर जगणाऱ्या भटक्या कुत्र्यांची उपासमार झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे काही गृहनिर्माण संस्थांमधील प्राणीप्रेमी नागरिकांनी या भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यास सुरुवात केली असून टाळेबंदी शिथिलीकरणानंतर या भटक्या कुत्र्यांनी या गृहनिर्माण संस्थांच्या परिसराला आपला आशियाना बनविला आहे. काही तरी खायला मिळेल या आशेवर ही भटकी कुत्री हा भाग सोडत नसल्याचे दिसून येते. अर्धपोटी अथवा उपाशी असलेली कुत्री रात्री-अपरात्री मोठय़ाने भुंकत असल्याने ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुलांची झोपमोड होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत.

पुनर्वसनासाठी १०० कोटीपर्यंत खर्च

२०१४ मध्ये नवी मुंबई पालिकेने शहरातील सर्वच भटक्या कुत्र्यांना पकडून एका जागी त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. निर्बीजीकरण केलेल्या कुत्र्याचे त्याच्या नैर्सगिक मृत्यूपर्यंत पालनपोषण या प्रस्तावानुसार केले जाणार होते, पण हा खर्च १०० कोटीपर्यंत असल्याने त्याला प्रशासनाने फारसे गांभीर्याने घेतले नाही. चार महिन्यांत शहरातील सर्वच भटक्या कुत्र्यांपासून नागरिकांना मुक्ती मिळणार होती, पण हा प्रस्ताव रखडला आहे.

शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आहे. सध्या महिन्याला १०० ते १५० भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली जात असून भटके कुत्रे सहज मिळणे कमी झाले आहे. पालिकेने स्वच्छ भारत अभियान चांगल्याप्रकारे राबविल्याने कुत्र्यांना अन्न मिळेनासे झाले आहे. त्यामुळे त्यांचा वसाहतींकडे जाण्याचे प्रमाण वाढले असून यामुळे वाद निर्माण झाले आहेत.

– डॉ. वैभव झुंजारे, पशुवैद्यकीय अधिकारी, नवी मुंबई पालिका