20 February 2019

News Flash

शीव-पनवेल महामार्ग अंधारात

मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी खाडीपुलावर दुरुस्तीचे काम सुरू आहे.

अपघाताची शक्यता; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

वाशी येथील खाडीपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे शीव-पनवेल महामार्गावर  वाहतूक कोंडी होत असताना गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील खारघर ते वाशीपर्यंतचा पट्टा अंधारात आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी खाडीपुलावर दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे आधीच वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून रात्रीच्या वेळी या महामार्गावर अंधार पसरत आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या अडचणीत अधिकच भर पडत आहे. खारघरपासून तुर्भेपर्यंत महामार्ग अंधारातच असतो. त्यापुढे वाशीपर्यंत काही ठिकाणी महामार्गावर रात्री अंधार असतो. या मार्गावरून रोज लाखो वाहने ये-जा करतात. वाशी, सानपाडा, तुर्भे, शिरवणे, नेरुळ, उरणफाटा, बेलापूर, खारघर येथे मोठे उड्डाणपूल आहेत. या पुलांखालून जाताना वाहनाचालकांना चाचपडावे लागते. बेलापूरकडे जाताना व येताना वीज नसल्याने खिंडीतही अंधारामुळे गोंधळ उडतो. तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

शीव-पनवेल मार्गावर खारघरपासून तुर्भेपर्यंतचा भाग अंधारात आहे. वीज व्यवस्थेची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. महामार्गावरील अंधाराबाबत पालिकेच्या वरिष्ठांना माहिती दिली आहे.

सुनील लाड, कार्यकारी अभियंता, नमुंमपा

महामार्गावरील पथदिवे बंद आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडे  विचारणा करण्यात आली आहे. खारघर येथे तांत्रिक बिघाडाबाबत सूचना देण्यात आल्या असून लवकरात लवकर याबाबत कार्यवाही करण्यात येईल.

एस. पी. श्रावगे, अधिकारी, सा. बां. विभाग

शीव-पनवेल महामार्गावर सातत्याने पथदिवे बंद पडतात. त्यामुळे वाहतुक कोंडी होते.  दुर्घटना घडण्याचीही शक्यता असते. सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे.

नितीन पवार, उपायुक्त, वाहतूक विभाग 

First Published on February 9, 2018 12:28 am

Web Title: street light issue in sion panvel highway