दोन महिन्यांतील दुसरी घटना; खांब दुभाजकावरच पडल्याने दुर्घटना टळली

नवी मुंबई</strong> : गंजलेल्या पथदिव्याचा खांब पामबीच मार्गावरील वाशीजवळील महात्मा फुले चौकात कोसळल्याची घटना सोमवारी घडली. पथदिव्याचा खांब दुभाजकावरच कोसळल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे.

नवी मुंबईतील सुमारे ३० हजार खांबांपैकी १७ हजार पथदिवे कालबाह्य़ झाले आहेत. गंजलेल्या अवस्थेतील पथदिव्यांचे खांब बदलण्याचा प्रस्ताव अद्यापही लालफितीत अडकलेला आहे.

काही दिवासांपूर्वीच नेरुळ सेक्टर २० जवळ पथदिवा रस्त्यावरील रिक्षावर कोसळला त्यात रिक्षाचे नुकसान झाले होते.

पामबाच हा वर्दळीचा मार्ग आहे. त्यामुळे ही घटना वाहतुकीच्या दृष्टीने गंभीर मानली जात आहे. नवी मुंबई १५ ते ३० वर्षे जुने पथदिव्यांचे खांब आहेत. ते सध्या गंजलेल्या अवस्थेत आहेत. तेव्हा ते केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. बेलापूर ते दिघापर्यंतच्या आठ विभागांमधील अनेक पथदिवे रस्त्यावर कोसळण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. याबाबत स्थायी समितीतही लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले होते. दुसरीकडे  सिडकोकालीन पथदिवे जुन्या माईल्ड स्टीलचे आहेत. त्यांची दुरवस्था झाली आहे. नवी मुंबई शहरात एकूण ३० हजार पथदिवे आहेत. त्यातील जवळजवळ १७ हजार पथदिवे कालबाह्य़ झाले आहेत. खराब पथदिव्यांची पाहणी करून तात्काळ नव्या पथदिव्यांचे खांब बदलण्याच्या सूचना प्रशासनास दिल्याची माहिती पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.