लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : नवी मुंबईत फेरीवाल्यांची दादागिरी वाढत आहे. गुरुवारी सीवूड्स विभागात कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकावर हल्ला करीत दोन जणांना जखमी केले. याबाबत बेलापूर विभाग कार्यालयाने एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दोन जणांना अटक करण्यात आली.

नेरुळसह विविध उपनगरांत फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांच्या ये-जा करण्याच्या मार्गावरही हे फेरीवाले बसलेले पाहायला मिळते.

सीवूड्स येथे बेलापूर विभाग कार्यालयातील एक पथक कारवाईसाठी गेले होते. पथकाने कारवाई करीत फेरीवाल्यांच्या गाडय़ा जप्त केल्या होत्या. यावेळी अजय शाहू व शिवपूजन गुप्ता या दोन फेरीवाल्यांनी पालिकेने जप्त हातगाडय़ा दमदाटी व मारहाण करुन जबरदस्तीने गाडीतून उतरवल्या.

यात दोन पालिका कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी बेलापूर विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांनी तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी सरकारी कामात हस्तक्षेप करणे यासह ३५३, ३३२, ३१४, ३४ कलमाखाली दोघांना अटक करण्यात आली असून इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती एनआरआय पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माधव इंगळे यांनी सांगीतले.

तर संबंधित प्रकरणात जखमी झालेल्या पालिकेच्या पथकातील विजय पारधी यांच्यावर पालिका रुग्णालयात उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती बेलापूर विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांनी दिली.