विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध; नवी मुंबई महापालिकेचा नावीन्यपूर्ण उपक्रम

नवी मुंबई : करोनाबाधितांचा करोना केंद्रातील कालावधी तणावरहित जावा आणि त्यांना सकारात्मक जीवनाची ऊर्जा मिळावी यासाठी सिडको एक्झिबिशन करोना केंद्रामध्ये ग्रंथालय तयार करण्यात आले आहे. या ग्रंथालयात विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली असून रुग्ण वाचनाचा आनंद घेत आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका आणि लेट्स रीड फाऊंडेशन यांच्या वतीने ‘करोना केंद्रामध्ये ग्रंथालय’ हा आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात आला असून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष केंद्रामध्ये जाऊन भेट देत पाहणी केली.

करोना केंद्रात दाखल झाल्यानंतर रुग्णाकडे बराच वेळ असतो, त्याशिवाय कुटुंबाशिवाय दूर एकटेच राहावे लागते. आजाराविषयी अधिक विचार करून रुग्णाचे मनोबल कमी होण्याची शक्यता असते. अशा वेळी त्याला माहिती, मनोरंजनपर विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून दिल्यास तो त्या विचारांपासून काही प्रमाणात दूर जाऊन पुस्तकांच्या जगात रमू शकतो. या पुस्तकांद्वारे त्याच्या मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होऊन त्याची उमेद वाढू शकते. याच विचारांतून ‘लेट्स रीड फाऊंडेशन’ या समर्पित भावनेने व्यापक वाचक चळवळ राबविणाऱ्या संस्थेच्या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सिडको एक्झिबिशन करोना केंद्रात हा अतिशय वेगळ्या स्वरूपाचा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. या ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांतील ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात आलेली असून पुस्तकांच्या निवडीवर खूप मेहनत घेण्यात आलेली आहे. हलकीफुलकी मनोरंजक पुस्तके तसेच प्रेरणा देणारी चरित्रे, सकारात्मक विचार देणारे ग्रंथ अशा विविध आशयाची आणि नामवंत लेखकांची पुस्तके या ठिकाणी आहे.

करोनाबाधित झालेली व्यक्ती करोना केंद्रात दाखल झाल्यानंतर त्याचे मानसिक मनोबल कमी होण्याची शक्यता असते. परंतु त्याला मिळालेल्या मोकळ्या वेळात पुस्तकांचे ग्रंथालय उपलब्ध असल्याने रुग्णाचे मानसिक बळ वाढू शकते. त्यामुळे हा उपक्रम राबवण्यात आला आहे.  – अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका