28 February 2021

News Flash

नवी मुंबईतही कडक निर्बंध?

नवी मुंबई शहरात नियंत्रणात असलेली करोना परिस्थिती पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडत आहे.

संग्रहीत

कार्यक्रमांना ५० च्या उपस्थितीची मार्यादा; दुकाने व हॉटेलांच्या वेळा बदलणार

नवी मुंबई : राज्याप्रमाणे नवी मुंबईतही करोना रुग्णांत वाढ होत असल्याने पालिका प्रशासनाने कडक निर्बंध लागू करण्याचे ठरविले आहे. यात सार्वजनिक व राजकीय कार्यक्रमांना पन्नास जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात येणार असून शहरातील दुकाने व हॉटेलांच्या वेळाही बदलण्यात येणार आहेत.

करोना निर्बंधांची ही नवी नियमावली पालिका आयुक्तांनी तयार केली असून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. यावर मंगळवारी पालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून त्यांनीही कडक नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांचे पालन न केल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही या वेळी देण्यात आले आहेत.

सध्या लग्नांचे मुहूर्त असून या सोहळ्यांना ५० पेक्षा जास्त गर्दी झाल्यास संबंधितांवर कारवाई व गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्तांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

नवी मुंबई शहरात नियंत्रणात असलेली करोना परिस्थिती पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडत आहे. दररोज नवे रुग्ण ३७ पर्यंत खाली आले होते, आता १०० पेक्षा अधिक करोना रुग्ण सापडत आहेत. तसेच उपचाराधीन रुग्णही एक हजारापेक्षा अधिक झाले आहेत. त्यामुळे करोना उपचारासाठी पालिका प्रशासनाने सुरू केलेली आरोग्य व्यवस्था रुग्ण घटल्याने बंद करण्यात आली होती, ती आता पुन्हा सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.  शहरात मुखपट्टीचा वापर होताना दिसत नाही. तसेच दुकानांच्या वेळा या ११ वाजेपर्यंत तर हॉटेलांच्या वेळा या रात्री १ वाजेपर्यंत आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक व राजकीय कार्यक्रमांना मोठी गर्दी होत आहे. त्याच्यावरही निर्बंध येणे गरजेचे आहे. त्यामुळे काही नवे निर्बंध लागू करण्याचे पालिका प्रशासनाने ठरविले आहे. यात सार्वजनिक व राजकीय कार्यक्रमांना उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा घालत केवळ पन्नास जणांच्या उपस्थित हे कार्यक्रम करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तर हॉटेल व दुकानांच्या वेळांत बदल करण्याचे ठरवले आहे. या नियमावलीबाबत पालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत चर्चा केली. यात मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहता नियम लागू करण्याच्या सूचना त्यांना दिल्या असून करोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांचे पालन न झाल्यास प्रसंगी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यानुसार सार्वजनिक व राजकीय कार्यक्रमांना आता ५० जणांच्या उपस्थितीचा नियम लागू करण्यात येणार असून दुकाने व हॉटेलांच्या वेळांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.

आठ पथकांद्वारे कारवाई

शहरात चित्रपट व नाट्यगृहांना ५० प्रेक्षक उपस्थितीची मर्यादा असून त्याचे काटेकारे पालन करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी न झाल्यास आयोजक व सभागृह व्यवस्थापन यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. पुढील पंधरा दिवसांत नागरिकांनीही सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. शहरात पुन्हा एकदा पालिका व नवी मुंबई पोलिसांची आठ पथके  करण्यात आली असून त्यांच्याद्वारे कारवाई करण्यात येणार आहे.

एपीएमसीत एका दिवसात १४० जणांवर कारवाई

करोना रुग्ण वाढत असताना वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत करोना नियमांना हरताळ फासला जात असल्याने कारवाईला वेग आला आहे. सोमवारी एका दिवसात १४० जणांवर तर १ फेब्रुवारीपासून आजपर्यंत ४०२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. बाजारात मुखपट्टीचा वापर करण्यास टाळाटाळ होत आहे.

नियम सर्वांसाठीच असावेत

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी परत टाळेबंदी कोणालाच परवडणारी नाही. त्यामुळे नियमावली करा, पण सर्वांनाच नियम लावा. राजकीय कार्यक्रमांना गर्दी, बस, ट्रेनमध्ये गर्दी असते, त्यावरही निर्बंध घाला.आता कुठे व्यवसायाची घडी बसवण्याचा प्रयत्न सुरू असताना निर्बंधांमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याचे नवी मुंबई व्यापारी महासंघाचे महासचिव  प्रमोद जोशी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 12:02 am

Web Title: strict restrictions in navi mumbai akp 94
Next Stories
1 सिडकोच्या ११ हजार घरांचा ताबा जूनमध्ये
2 पन्नास किलोपेक्षा जास्त वजन न उचलण्याचा निर्णय
3 ‘डॉन’बाबत वक्तव्यावरून नाईकांची कानउघाडणी
Just Now!
X