मी दुप्पट कर भरणार नाही..समाजमाध्यमांवर मोहीम; नगरविकासमंत्र्यांच्या सूचनेनंतर कार्यवाही करण्याची शिवसेनेची मागणी

पनवेल : खारघर येथील भाजपच्या नगरेसविका लीना गरड यांनी पालिकेला घरचा आहेर देत नागरिकांकडून पालिकेने वसूल करण्यास सुरुवात केलेल्या मालमत्ता कराला विरोध दर्शवित ‘मी दुप्पट कर भरणार नाही, तुम्ही भरणार का?’ असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित करून समाजमाध्यमांवर जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. यामुळे पालिकेचे पाचशे कोटी थकीत कर कोषागारात जमा होण्याचे स्वप्न भंग होण्याची चिन्हे आहेत.

नगरसेविका गरड यांनी वाढीव कराला विरोध केल्यामुळे पालिका क्षेत्रात नागरिकांचा जोरदार विरोध झाला होता. त्यानंतर अनेक संघटना व राजकीय पक्षांनी गरड यांच्या भूमिकेचे समर्थन करत पालिकेविरोधात आंदोलन पुकारले. यामध्ये खारघर फोरम संस्था, कामोठे- कळंबोली- खांदा कॉलनी- नवीन

पनवेल- तळोजा कॉलनी फोरमची साथ त्यांना मिळाली. त्यानंतर पालिकेने ३० टक्के दर कमी केले असले तरी अजूनही सिडको महामंडळाकडून सिडको वसाहतींमध्ये सेवा शुल्क, पाणीपट्टी, सिडको सदनिका हस्तांतरण निधी अशी वेगवेगळी शुल्क आकारणी सुरूच आहे. त्यामुळे पालिकेतील एका मालमत्तेसाठी दोन वेगवेगळ्या संस्थांना कर व शुल्क का भरावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या पाच वर्षांचा मालमत्ता कर नागरिकांसाठी करोनाकाळात जिझिया कराप्रमाणेच पनवेलकरांवर लादला आहे. कर लादणारे अशा प्रकारे ठाम राहिल्यास त्यांना पालिकेच्या आगामी निवडणुकीत त्यांची जागा मतदारच दाखवतील. नागरिकांना हे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नसल्याने आम्हालाही भूमिका मांडावी लागत आहे, असे गरड यांनी सांगितले.

कर भरण्यासाठी सवलतींची घोषणा

जास्तीत जास्त मालमत्ताकर वसुली करण्याचे पालिका प्रशासनाने ठरविले आहे. यासाठी नागरिकांनी मालमत्ता देयके लवकरात लवकर भरून प्रोत्सहनपर सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे. मालमत्ता कर ३१ जुलैपूर्वी भरल्यास प्रोत्साहनपर १५ टक्के सूट देण्यात येणार आहे तर ऑनलाइन प्रणालीचा वापर केल्यास २ टक्के अशी १७ टक्के सवलत देण्यात आली आहे. १ एप्रिल २०२३ नंतर मालमत्ता करावर दर महिना नियमानुसार शास्ती आकरण्यात येणार आहे. मालमत्ता करासंबधित माहिती हवी असल्यास १८००-५३२०-३४० या टोल फ्री क्रमांकावर सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत शासकीय सुटीचे दिवस वगळून संपर्क साधता येणार आहे.