कळंबोली वसाहतीमध्ये बारावीच्या विद्यार्थिनीने परीक्षेचे प्रवेशपत्र महाविद्यालयातून मिळणार नाही, या भीतीने गळफास लावून आत्महत्या केली.
लिनता मानकामे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. कळंबोली वसाहतीमधील सुधागड महाविद्यालयात बारावीच्या कला शाखेत लिनता शिकत होती. मानकामे कुटुंबीय सेक्टर ८ येथील सत्यकुंज इमारतीमध्ये राहतात. मराठी विषयाचा अभ्यास पूर्ण न झाल्याने परीक्षेचे प्रवेशपत्र मिळणार नाही, या भीतीने लिनता हिने आत्महत्या केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. आर. पोपेरे यांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. लिनता हिचे वडील भरत मानकामे हे रिक्षाचालक आहेत, तर आई खासगी नोकरी करते. लिनता हिने मृत्युपूर्वी लिहिलेल्या पत्रात, मराठी विषयाच्या गृहपाठाची वही पूर्ण न करू शकल्याने महाविद्यालयातून तिला परीक्षेचे ओळखपत्र मिळणार नाही, अशी भीती व्यक्त केली
होती.
लिनता हिला मोठय़ा तीन बहिणी आहेत. लिनताने आपल्या मृत्युपूर्वी लिहिलेल्या पत्रात परीक्षेत गुण मिळण्याचे दडपण, परीक्षा प्रवेशपत्र न मिळण्याची भीती, अभ्यास कमी झाल्याचे लिहीत आईपप्पांना आत्महत्येचे पाऊल उचलत असल्याने माफी मागितली आहे. पत्रात आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये असेही म्हटले आहे.
दरम्यान, आमच्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांला परीक्षेचे प्रवेशपत्र देण्याविषयी अटी नाहीत असे सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंत ओसवाल यांनी सांगितले.