९० टक्के गूण; ‘सीए’ होण्याचे स्वप्न

नवी मुंबई मस्क्युलर डिसट्रॉफी (muscular Dystrophy) या आजाराने कमरेपासून खाली शरीराच्या कोणत्याही भागाची हालचाल होत नाही.. कायमस्वरूपी व्हीलचेअरवर खिळलेला असताना अमेय सावंत या विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळविले आहेत.

परीक्षेत गुण कमी पडले वा अपयश आले की विद्यार्थी अपयशाने खचून जातात. मात्र  वाशी सेक्टर १० मध्ये जे एन २ टाइपच्या महालक्ष्मी सोसायटीत राहणाऱ्या अमेय सावंतच्या जिद्दीचे कौतुक होत आहे.

इयत्ता पाचवीपर्यंत अमेय सर्वसामान्य मुलांसारखा आयुष्य जगत होता. मात्र अचानक त्याला मस्क्युलर डिसट्रॉफी या जर्जर आजाराने ग्रासले. पायापासून कमरेपर्यंतच्या शरीराच्या अवयवांची हालचाल बंद झाली. व्हीलचेअरवरच त्याचा जीवनप्रवास सुरू झाला. मात्र तो खचला नाही.

अभ्यासाबरोबर व्हीलचेअरवर बसूनच तो क्रिकेट व अन्य खेळही खेळतो. दहावीच्या परीक्षेत त्याला लेखनिक घ्यावा लागला. आई वडिलांनीही खचून न जाता त्याला साथ दिली.

कोणतीही खाजगी शिकवणी न लावता दहावीच्या परीक्षेत त्याने ९०.६० टक्के गुण मिळवले आहेत. त्याचे ‘सीए’ होण्याचे स्वप्न असून त्याने वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याचे ठरवले आहे.