दोन हजार पैकी चारशे पालकांकडेच स्मार्ट मोबाइल

पनवेल : ऑनलाइन शिक्षण सुरू आहे.. असे शासन सांगत असले तरी पनवेल महापालिकेच्या ११ प्राथमिक शाळांतील सुमारे २००० विद्यार्थी मात्र शिक्षणापासून वंचितच आहेत. एकतर बहुतांश विद्यार्थ्यांकडे मोबाइल नाही, असला तरी पालक घरी नसतात. त्यामुळे शिक्षण बंदच असल्याचे चित्र आहे.

पनवेल शहरातील ११ पालिकेच्या शाळांमधील दोन हजार विद्यार्थ्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष हे अन्नाची शिदोरी विद्यालयातून घरी आणण्यातच गेली आहे. शासनाचा माध्यान्ह भोजनासाठी मिळणारा तांदूळ पालक विद्यलयातून घरी नेत आहेत. परंतु विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मात्र बोजवारा उडाला आहे.

टाळेबंदीच्या काळात ७४ शिक्षकांना करोना संसर्ग मोहिमेत कामासाठी जुंपण्यात आले. तीन शिक्षकांना करोनाची लागण झाली. ते बरे होऊन पुन्हा कामावर परतले आहेत. मात्र पालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांपर्यंत शिक्षण मात्र पोहचू शकले नाही. पालिकेने हे शिक्षण पोहचविण्यासाठी काही बैठका घेतल्या मात्र, त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार पालिका शाळांत दोन हजार विद्यार्थी असून यापैकी ४०० पालकांकडे मोबाइल फोन आहे. मात्र ते सकाळी कामावर निघून जातात ते रात्री घरी परततात. त्यामुळे शिक्षण विभागाने पाठविलेला दिक्षा अ‍ॅपची लिंक विद्यार्थ्यांपर्यंत दिवस संपल्यानंतर पोहचते. पालिकेने विद्यार्थ्यांना पुस्तके दिली आहेत, मात्र शिक्षक त्यांच्यापर्यंत ऑनलाइन पोहचू शकत नाहीत. पालक त्यांना शिकवू शकत नाहीत. विशेष म्हणजे रायगड जिल्हापरिषदेच्या २४८ शाळांमधील २२ हजार विद्यार्थ्यांपैकी ६० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण दिक्षा अ‍ॅपच्या माध्यमातून पोहचले आहे.

‘मोबाइल बँक’ राबविणार

सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत वंचित व गरजू घटकापर्यंत टाळेबंदीतसुद्धा शिक्षण पोहचले पाहिजे हेच दीक्षा अ‍ॅपच्यामार्फत शिक्षण विभागाचे मूळ उद्दिष्ट आहे. अनेक ठिकाणी मोबाइल नाही अशा अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र शाळेची ‘मोबाइल बँक’ ही मोहीम राबविली गेल्यामुळे अनेक गरजूंना मदत मिळाली आहे. पनवेल पालिकेच्या शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकडे माोबाइल नसतील तर ‘मोबाइल बँक’ मोहीम तेथील शिक्षण विभाग राबवू शकेल. याबाबत  चर्चा केली जाईल, असे शिक्षण विभागाचे उप संचालक अनिल साबळे यांनी सांगितले.

चारशे विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन आहेत. यामधील काही विद्यार्थ्यांनाच पालकांकडून फोन उपलब्ध करून दिला जातो. पालक सकाळीच कामासाठी बाहेर पडत असल्याने शिक्षणात अनेक अडचणी येत आहेत. सर्व विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके देण्यात आली आहेत. शिवाय माध्यान्ह भोजनासाठी तांदूळही दिला आहे. शिक्षक मुलांना लिंक पाठवीत आहेत.

-संजय शिंदे, उपायुक्त, पनवेल पालिका, शिक्षण विभाग