पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी वनविभागाकडून मोफत बससेवा

पूनम धनावडे, नवी मुंबई</strong>

ऐरोलीतील सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्रात पक्षिप्रेमी, पर्यटक यांच्यासाठी बोटीतून खाडीसफर सुरू करण्यात आली आहे. मात्र आता पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सागरी जैवविविधतेची अधिक माहिती करून देण्यासाठी वन विभागाच्या वतीने मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

२६ किलोमीटरच्या खाडी परिसरात २०० हून अधिक पक्षी स्थलांतर करीत असतात. फ्लेमिंगोसह अनेक विदेशी पक्षीही खाडीकिनाऱ्यावर दरवर्षी आश्रयाला येतात. यात पेटंट स्टार्क, पाइट, स्टील्ट, गल, ग्लोवर आदी परदेशी पक्ष्यांचा समावेश आहे. खाडीतील विविध प्रकारच्या  जैवविविधतेची माहिती आणि खाडीकिनाऱ्यांचे महत्त्व, किनाऱ्यांचे संरक्षण कसे करावे, पक्षिनिरीक्षक आणि पर्यावरण यांची माहिती होण्यासाठी या केंद्रात शालेय विद्यार्थ्यांना ही सफर घडविण्यात येणार आहे.

वन विभागाच्या वतीने ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या या केंद्रात परदेशी विद्यार्थीही पर्यटक म्हणून दाखल होत आहेत, तसेच शहरातील खासगी शाळांमधील विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात पक्षिनिरीक्षणासाठी येत आहेत. मात्र पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या त्या प्रमाणात कमी असल्याने या विद्यार्थ्यांनाही यात सामावून घेण्यासाठी ही नि:शुल्क बससेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती वन विभाग अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

या केंद्रात शालेय विद्यार्थ्यांना सागरी पट्टा, कांदळवन, इतर जैवविविधतेची माहिती देण्यासाठी संग्रहालय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. याकरिता खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु. २५ प्रवेश शुल्क भरून प्रवेश दिला जातो, तर शासकीय शाळेतील बुधवारी मोफत प्रवेश दिला जातो. शासकीय म्हणजेच पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना व्यापक स्वरूपात सामावून घेण्यासाठी वन विभाग आता मोफत बससेवा पुरविणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सीएसआर निधीतून भाडय़ाने बस घेण्याचे नियोजन असून ते शासनाच्या मंजुरीच्या टप्प्यात आहे. त्यानंतर वन विभाग स्वत: बस खरेदी करणार आहे. असल्याची माहिती वन विभाग अधिकाऱ्यांनी दिली. नवी मुंबईसह ठाणे, मुंबई महापालिका शिक्षण विभागाला तसे पत्र दिले असून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोहोचण्याचे नियोजन वन विभागाने केले आहे. पुढील तीन वर्षांत १० हजार विद्यार्थ्यांना याची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

‘बोटिंग सफरी’लाही भरघोस प्रतिसाद

यंदा हिवाळा लांबल्याने रोहित (फ्लेमिंगो) चा हंगामाला उशिरा सुरुवात झाली आहे. मात्र आता त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात फ्लेमिंगोची उपस्थिती वाढली असल्याने पक्षिप्रेमी यांचा खाडीसफरीकडे कल वाढला आहे. १५ नोव्हेंबरपासून बोटिंग सुरू करण्यात आली असून येत्या आठ दिवसांत फ्लेमिंगोची संख्या अधिक वाढेल तसे पर्यटकांची संख्यादेखील वाढेल, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. पर्यटकांबरोबरच पालिका शाळेतील विद्यार्थ्यांनादेखील मोफत बोटिंग सेवा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या केंद्रात परदेशी विद्यार्थीदेखील मोठय़ा संख्येने दाखल होत आहेत. तसेच शहरातील खासगी शालेय विद्यार्थीदेखील या केंद्राला भेट देत आहेत, तर दुसरीकडे त्या प्रमाणात पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसत आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंतदेखील सागरी किनारपट्टी, कांदळवन, जैवविविधता यांची माहिती होण्यासाठी त्यांनादेखील सामावून घेण्याचे नियोजन आहे. याकरिता प्रायोगिक तत्त्वावर बस उपलब्ध करून देण्यात येत असून ती मंजुरीच्या प्रक्रियेत आहे.  तीन वर्षांत १० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा मानस आहे.

एन. जे. कोकरे, वन परिक्षेत्र अधिकारी, वन विभाग ऐरोली